शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:07 AM2018-11-30T01:07:08+5:302018-11-30T01:07:53+5:30
मंगळवारी पार पडलेल्या एका पार्श्वगायकाच्या लाईव्ह शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी पार पडलेल्या एका पार्श्वगायकाच्या लाईव्ह शोच्या आयोजकांनी आपली फसगत केल्याची तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना ठाण्यात बोलवून चौकशी सुरू केली आहे.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात मंगळवारी रात्री बॉलिवूडच्या एका पार्श्वगायकाचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी शहरात जागोजागी होर्डिंग लावण्यात आले होते. शिवाय मोठमोठ्या हॉटेल्स आणि मॉलमध्ये या शोच्या तिकिटाही विकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य गायकाने या शोसाठी ३० लाख रुपये घेतले होते तर अन्य एका महिला गायकाने ५ लाख रुपये घेतले होते. खर्च अवाढव्य झाला तरी अपेक्षेप्रमाणे तिकिटा विकल्या गेल्या नाही. आयोजकांना पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा कार्यक्रम तब्बल दीड ते दोन तास उशिरा सुरू झाला. त्यात स्टेजच्या बाजूला असलेल्या भागातील पडदा फाडून मोठ्या संख्येत बघे आतमध्ये शिरले. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अशात मुख्य गायक रात्रीचे ८.४५ वाजले तरी स्टेजवर आला नाही. त्यामुळे प्रचंड संशयकल्लोळ निर्माण झाला.
हॉटेलमध्ये गोंधळ
दरम्यान, मुख्य गायक आणि सहकाऱ्यांची व्यवस्था इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीने वर्धा मार्गावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये केली होती. गायक निघण्याच्या तयारीत असताना हॉटेलचे बिल पाठविण्यात आले. गायकाने आयोजकाकडे बोट दाखवले तर आयोजकांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांना बोलविण्यात आले. त्यांनी आपला धनादेश दिल्यानंतर ‘चेक आऊट’ झाले. दरम्यान, आयोजकाने ठरविल्याप्रमाणे आपली रक्कम वेळेवर दिली नाही. आपली फसवणूक केली, अशी तक्रार इव्हेन्ट कंपनीच्या संचालकांनी गिट्टीखदान ठाण्यात दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत लगेच चौकशी सुरू केली. शुक्रवारी यासंबंधाने पोलीस चौकशी अन् कारवाई करणार असल्याचे गिट्टीखदान पोलिसांनी सांगितले.