नागपुरात केंद्रीय राज्यमंत्री हेगडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:34 PM2018-01-01T21:34:45+5:302018-01-01T21:36:59+5:30
कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सायंकाळी हा तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला.
कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्याच्या पुकानूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ‘आम्ही राज्यघटना बदलविण्यासाठीच सत्तेत आलो. ती लवकरच बदलू’, असे विधान राज्यमंत्री हेगडे यांनी केल्याचा सदर तक्रारअर्जात आरोप आहे. ‘सेक्युलर असणे म्हणजे मायबाप नसण्यासारखे आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दाला हरकत घेऊन अशी कोणती संकल्पनाच अस्तित्वात नसल्याचे जाहीर वक्तव्य राज्यमंत्री हेगडे यांनी केल्याचा आरोप’ तक्रारअर्जात आहे. हेगडे यांचे हे वक्तव्य देशातील जाती-धर्मात दुही निर्माण करणारे असून, त्यामुळे भारतातील नागरिकांची मने कलुषित होऊ शकतात. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी यापूर्वीच नोंदविण्यात आली आहे. आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था संघटनांमध्ये कार्यरत अनुयायांनी हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास इमामवाडा पोलिसांना दिला. ठाणेदार रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हा तक्रार अर्ज देताना प्रा. राहुल मून, सुधीर भगत, अॅड. सुरेशचंद्र घाटे, सुखदेव मेश्राम, अमोल कडबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री हेगडेंविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. ठाणेदार दुर्गे यांनी त्यांचा हा तक्रारअर्ज स्वीकारला.
तक्रार वरिष्ठांकडे पाठवू : ठाणेदार
अशा प्रकारची तक्रार आम्हाला मिळाल्याची माहिती ठाणेदार दुर्गे यांनी लोकमतशी बोलताना दिली. पुढील कारवाईसाठी आम्ही ती वरिष्ठांकडे पाठवू, वरिष्ठ त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असेही दुर्गे लोकमतशी बोलताना म्हणाले.