चिल अॅन्ड ग्रीलच्या गोळीबाराने पोलीस कन्फ्यूज
By admin | Published: February 16, 2016 04:10 AM2016-02-16T04:10:32+5:302016-02-16T04:10:32+5:30
सदरमधील चिल अॅन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या कथित गोळीबारासंदर्भात पोलीस कन्फ्यूज आहेत. घटनेनंतर खुद्द
नागपूर : सदरमधील चिल अॅन्ड ग्रील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या कथित गोळीबारासंदर्भात पोलीस कन्फ्यूज आहेत. घटनेनंतर खुद्द रेस्टॉरंट संचालिकेने तोडफोड अन् गोळीबाराची पत्रकारांना माहिती दिली. परंतु घटनेच्या १८ तासानंतर पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी हाणामारी झाल्याचे सांगतानाच ‘गोळीबार झाला की नाही’ त्याचे आम्ही पुरावे शोधत आहोत, असे सांगितले.
सदरमधील तुली ते पूनम चेंबर मार्गावरील एका इमारतीच्या टेरेसवर चिल अॅन्ड ग्रील रेस्टॉरंट आहे. अजय बागडी आणि त्यांची पत्नी शिल्पी हे रेस्टॉरंट चालवितात. रविवारी रात्री येथे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने नेहमीपेक्षा जास्तच गर्दी होती. रात्री ११.३० च्या सुमारास गड्डीगोदाम भागातील काही गुंड आले. त्यांनी रेस्टॉरंटमधील तरुणींशी लज्जास्पद वर्तन केले. ते पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. त्यामुळे आरोपींनी प्लेटांची फेकाफेक केली. खाली येऊन ते अश्लील शिवीगाळ करीत असल्यामुळे हॉटेलमधील एका बाऊन्सरने त्यांना चोप दिला. त्यामुळे आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलवून घेतले. ते घाणेरडी शिवीगाळ करीत असल्यामुळे लिफ्टजवळ एका तरुणाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्या डोक्यावर बीअरची बाटली फोडली. या घटनेनंतर जखमी तरुणाला घेऊन त्याची मैत्रीण निघून गेली. त्यानंतर आरोपींनी खालून दगडफेक केली. एवढेच नव्हे तर एकाने माऊझरमधून ३ राऊंड फायर केले. गोळीबारामुळे तणाव आणि दहशत निर्माण झाली.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने नियंत्रण कक्षाला दिल्यामुळे मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. मध्यरात्री १ च्या सुमारास प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही घटनास्थळी पोहचले. त्यांच्याशी बोलताना रेस्टॉरंटच्या संचालिका शिल्पी बागडी यांनी गुंडांनी हैदोस घातल्याची तसेच गोळीबार केल्याची माहिती दिली. एवढ्यात नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकरही घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी रक्ताचे डाग, तोडफोडीचे चित्र बघून रेस्टॉरंटचे संचालक तसेच व्यवस्थापकाकडून माहिती घेतली, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. सोमवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी गोळीबार झाला की नाही, त्याबाबत आम्ही ठोस निष्कर्ष काढला नसल्याचे पत्रकारांना सांगितले. गोळीबार झाला किंवा नाही ते तपासण्यासाठी रेस्टॉरंट परिसर तसेच आजूबाजूच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे उपायुक्त लाटकर यांनी सांगितले. याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. यामुळे सदर पोलीस ठाण्यात हॉटेलचे कर्मचारी आणि त्यांच्याशी हाणामारी करणारे अशा दोन्ही गटातील २० ते २५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात तक्रार मिळत नसल्याचे पाहून सरकारतर्फे सदरमधील पोलीस अधिकारीच फिर्यादी झाले. राज गजानन बिसन ( रा. सुभाषनगर, प्रतापनगर), सोनपाल रतनसिंग राणा (उत्तर काशी, उत्तराखंड) आणि रेस्टॉरंटचे काही कर्मचारी आणि दगडफेक, कथित गोळीबार करणारे ८ ते १० आरोपी अशा दोन्ही गटांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी सदरचे ठाणेदार रफीक बागवान यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्याजागी मनोज सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘ती’ तरुणी मिळाली
ज्या तरुणाला आरोपींनी जखमी केले, त्या तरुणाचा अद्याप सुगावा लागला नाही. मात्र, त्याच्या मैत्रिणीची माहिती आम्हाला मिळाली. परंतु तिचा मोबाईल बंद असल्यामुळे आम्ही तिच्याकडून सविस्तर माहिती घेऊ शकलो नाही. या प्रकरणात गैरकायद्याची मंडळी जमवून तोडफोड केल्याचा (दंगा) गुन्हा आम्ही दाखल केल्याचे उपायुक्त लाटकर यांनी सांगितले. परिमंडळ १ चे उपायुक्त शैलेष बलकवडे यांच्या कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा उपस्थित होते.
वादग्रस्त पार्श्वभूमी
रेस्टॉरंटची पार्श्वभूमी वादग्रस्त असल्याचे लाटकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. येथे बिनबोभाट हुक्का पार्लर चालतो आणि संचालक अजय बागडी यांच्याविरुद्ध यापूर्वी सदर ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल झाली होती, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्यांनी ते खरे असल्याचे म्हटले. यापूर्वी येथे कारवाई केल्याचेही लाटकर यांनी सांगितले.