नागपुरात पोलीस-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2022 04:43 PM2022-06-17T16:43:37+5:302022-06-17T16:44:07+5:30
Nagpur News काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) तर्फे वारंवार चौकशीसाठी बोलावून विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) तर्फे वारंवार चौकशीसाठी बोलावून विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधाात घोषणा देण्यात आल्या. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कठडे लावले होते. ते ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्ते करीत हाेते. त्यावेळी कार्यकर्ते व त्यांना थांबवणारे पोलीस यांच्यात धक्काबुकी झाली. यामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्यासह दोन कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ अभिजित वंजारी, गिरीश पांडव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत शहर अध्यक्ष नॅश अली, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्यासह शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कठडे लावले होते. ते ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न शेळके आणि काही कार्यकर्ते करीत होते. यावेळी झालेल्या धक्काबुकी आणि रेटारेटीत शेळके जमिनीवर पडले. त्यांना दुखापत झाली. त्यांना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले