नागपुरात गुन्हेगारांसोबत पोलीस शिपायाचा डान्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:58 PM2018-09-19T23:58:09+5:302018-09-19T23:59:21+5:30
कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात शहर पोलिसातील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात शहर पोलिसातील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती होत आहे.
या व्हिडिओमध्ये कोतवाली पोलीस ठाण्यातील शिपाई ताजबागचा गँगस्टर आबू आणि शांतिनगरमधील गुन्हेगार अशोक बावाजी याच्यासोबत दिसून येत आहे. दोन्ही गुन्हेगार शिपायासोबत नाचगाणे करीत मौजमजा करीत आहेत. शिपाई आणि दोन्ही गुन्हेगार आपल्या साथीदारांसह अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध ‘याराना’ या चित्रपटातील गाणे ‘तेरे जैसा यार कहाँ...’ या गाण्यावर स्टेजवर नाचताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर असे दिसून येते की, ‘गुन्हेगारांनी एका पार्टीचे आयोजन केले असून, त्यात पोलीस शिपाईसुद्धा सहभागी झाला आहे. आबू एकावेळी सक्करदरा पोलीस ठाणे परिसरातील चर्चित नाव होते. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. तत्कालीन पोलीस उपायुक्त निषिथ मिश्र यांनी त्याला एमपीडीएअंतर्गत तुरुंगातही पाठविले होते. यानंतर आबूच्या कारवायांवर वचक बसला. परंतु आबू आणि त्याच्या कुटुंबाचा दबदबा ताजबाग परिसरात कायम आहे. त्याचप्रकारे अशोक बावाजी हासुद्धा शांतिनगर पोलीस ठाणे परिसरातील चर्चित नाव आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. इतवारी स्टेशनजवळ जुगार अड्डा चालवीत असल्याने तो नेहमीच चर्चेत राहतो. त्याच्या अड्ड्यावर अनेकदा पोलिसांनी धाड टाकून नेत्यांनाही पकडले आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये बावाजीची उपस्थिती पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.
सूत्रानुसार गुन्हेगारांनी नुकतीच बर्थडे पार्टी आयोजित केली होती. यात कोतवाली पोलीस ठाण्यातील शिपायासह सात-आठ पोलीस कर्मचारीही सहभागी झाले. पार्टीतील काही लोक व्हिडिओ क्लिपिंग बनवत असल्याचे लक्षात येताच, इतर पोलीस कर्मचारी तेथून रवाना झाले. तडीपार असूनही बावाजी तिथे उपस्थित असल्याने पोलिसांची फजिती वाढणे निश्चित आहे. तडीपार असतानाही गुन्हेगार शहरात सक्रिय असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या घटनांमुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या निर्देशानुसार, ठाण्यात तडीपार गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे.
दारू पिऊन शिपायाने घातला गोंधळ
त्याचप्रकारे पंचशील चौकात वर्धा येथील एका पोलीस शिपायाने दारू पिऊन गोंधळ घातला. वर्धा पोलिसचा शिपाई संदीप खंडारे मंगळवारी रासायनिक प्रयोगशाळेत नमुने जमा करण्यासाठी आला होता. नमुने जमा केल्यानंतर तो पंचशील चौकातील बारमध्ये दारू प्याला. बारमधून निघाल्यावर पंचशील चौकातच तो गोंधळ घालू लागला. याची माहिती मिळताच धंतोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस अॅक्ट कलम ११० आणि ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. धंतोली पोलीस या प्रकरणाचा रिपोर्ट वर्धा पोलिसांना पाठविणार आहे. या आधारावर त्याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाईसुद्धा केली जाईल.