नागपुरात पोलीस शिपायाने लावली घरात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:56 PM2019-04-02T23:56:16+5:302019-04-03T00:00:58+5:30

एका छोट्या मात्र सुखी कुटुंबात कोतवाली ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आग लावली आहे. या कुटुंबातील महिलेला पोलीस शिपायाने आपल्या नादी लावून सुखी संसारात विष कालवले आहे. परिणामी महिलेचा पती, मुली आणि कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले असून, या कुटुंबाचा बंदोबस्त करावा म्हणून सदर व्यक्तीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Police constable set ablez his own house in Nagpur | नागपुरात पोलीस शिपायाने लावली घरात आग

नागपुरात पोलीस शिपायाने लावली घरात आग

googlenewsNext
ठळक मुद्दे१६ वर्षांच्या सुखी संसाराला ग्रहण : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका छोट्या मात्र सुखी कुटुंबात कोतवाली ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आग लावली आहे. या कुटुंबातील महिलेला पोलीस शिपायाने आपल्या नादी लावून सुखी संसारात विष कालवले आहे. परिणामी महिलेचा पती, मुली आणि कुटुंबातील सदस्य अस्वस्थ झाले असून, या कुटुंबाचा बंदोबस्त करावा म्हणून सदर व्यक्तीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
तक्रार करणारा व्यक्ती (वय ४०) भुतेश्वरनगर गंगाबाई घाट जवळ राहतो. त्याने आयुक्तांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे घरातच छोटेसे किराणा दुकान असून, पत्नी (वय ३६) तसेच दोन मुली व आईवडिलांसह तो आपले कुटुंब चालवतो. ३ फेब्रुवारीला त्याच्या बहिणीने त्याची तक्रार केल्यामुळे कोतवाली पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलवून घेतले आणि त्याची बाजू न ऐकता अटक केली. यावेळी त्याची पत्नी त्याला सोडविण्यासाठी ठाण्यात आली. पत्नीने यावेळी ठाण्यात असलेल्या रंजित राठोर नामक पोलीस शिपायाला मदत मागितली. त्याने आपली साहेबांसोबत चांगली मैत्री असून, तुम्ही घाबरू नका, तुमच्या पतीला सोडविण्यासाठी मदत करतो, आश्वासन देऊन तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला आपला नंबर दिला. दरम्यान, दुपारी ४ वाजता न्यायालयातून पीडित व्यक्तीची सुटका झाली. त्यानंतर पोलीस शिपायाने सकाळ, सायंकाळ पीडित व्यक्तीच्या पत्नीला गुड मॉर्निंग, गूड नाईटचे मेसेज पाठविणे सुरू केले. बराच वेळेपासून नाश्ता बनवायला गेलेली पत्नी आली नसल्याने अचानक तो किचनमध्ये गेला. यावेळी पत्नी मोबाईलवर दुसऱ्यासोबत बोलताना दिसली. पतीला पाहून ती घाबरल्याने तिने मोबाईल लपवून ठेवला. पतीने तिला विचारणा केली असता तिने बनवाबनवी केली. त्यामुळे संशय वाढल्याने त्याने तिचा मोबाईल नंबर तपासला असता ती राठोरसोबत नेहमी बोलत असल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबात वादळ येऊ शकते, हे ध्यानात आल्याने पतीने पत्नीला समजावतानाच राठोरला फोन करून आपल्या कुटुंबाला विस्कळीत न करण्याची विनंती केली. यावेळी राठोरने त्याला अश्लील शिवीगाळ करून खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली.
यापुढे पत्नीला टोकले तर परिणाम चांगले होणार नाही, अशीही धमकी दिली. त्यावरून पती-पत्नीत मोठा वाद झाला. त्यानंतर पत्नी मुलींसह घरून निघून गेली आणि साळ्याने जोरदार मारहाण केली. एवढेच नव्हे तर नंतर राठोर आणि त्याच्या सोबतच्या तीन पोलिसांनी ठाण्यात बोलवून बेदम मारहाण केली. पुन्हा पत्नीसोबत काही केल्यास पाच वर्षांसाठी आत टाकेन, अशी धमकी दिली. दुसरीकडे पत्नीने राठोरसोबत घरी येऊन मुलींचे व तिचे कपडे, दागिने आणि कागदपत्रे सोबत नेले. तेव्हापासून पत्नीला फोन करायचा नाही, भेटायचे नाही, अशी पोलीस शिपाई राठोरने धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या एकूणच प्रकारामुळे आपले छोटे मात्र सुखी कुटुंब विस्कळीत झाले असून, राठोर यासाठी जबाबदार असल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे.
कोणती कारवाई होणार?
चार दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने महिला रेडिओ जॉकीला आक्षेपार्ह मेसेज केल्यामुळे त्याच्यावर सीताबर्डीत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची चर्चा ताजीच असताना आता एका पोलीस शिपायाने एका कुटुंबात कलह वाढवल्याने अवघ्या पोलीस दलाच्याच प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात आता कोणती भूमिका घेतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Police constable set ablez his own house in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.