पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By admin | Published: September 15, 2015 06:00 AM2015-09-15T06:00:06+5:302015-09-15T06:00:06+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असल्यामुळे राजभवनासह उपराजधानीतील विविध भागात
नागपूर : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असल्यामुळे राजभवनासह उपराजधानीतील विविध भागात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या विशेष सुरक्षा पथकातील अधिकाऱ्यांच्या दिशानिर्देशांवरून उपराजधानीत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राष्ट्रपती नागपूरच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे चार दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या उपाययोजना ठरविण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या हॉटेलसह लॉजची तपासणी सुरू आहे. विमानतळापासून राजभवनापर्यंतचा परिसर आणि कार्यक्रमस्थळावर दोन दिवसांपासून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हवाईमार्गे बाहेरून येणाऱ्यांची माहिती ठेवली जात असून, शहराला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर नाकाबंदी, वाहनांची, व्यक्तींची तपासणी केली जात आहे.
रस्त्यावरचा बंदोबस्त आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी तीन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबईतून आलेल्या विशेष सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत विशेष सुरक्षा दलाचे (एसपीयू) स्थानिक अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही जातीने बंदोबस्त हाताळत आहेत.(प्रतिनिधी)
वाढली होती काळजी
राष्ट्रपतींच्या आगमनाच्या तासाभरापूर्वी वातावरण एकाएकी बदलले. दुपारीच एकाएकी अंधार पडला. मुसळधार पाऊसही झाला. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांची काळजी वाढली होती. मात्र, राष्ट्रपतींच्या आगमनाच्या काही वेळेपूर्वी पुन्हा वातावरण जैसे थे झाले. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांवरील ताण कमी झाला.