आरोग्य उपसंचालकाच्या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:42 PM2021-03-04T23:42:53+5:302021-03-04T23:44:30+5:30
Deputy director of health's son missing case आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचा मुलगा सारंग (२२) बुधवारी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. दरम्यान सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांची टीम कामाला लागली. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिसांनी या २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत कुटुंबीयांच्या सुपूर्द केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (भिवापूर ): आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचा मुलगा सारंग (२२) बुधवारी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. दरम्यान सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांची टीम कामाला लागली. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिसांनी या २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. दुपारनंतर चाललेल्या या शोधमोहिमेमुळे मात्र शहर आणि ग्रामीण पोलिसांची तारांबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी (दि.३) सकाळच्या सुमारास घरगुती कारणामुळे दुखावलेला सारंग कुणालाही न सांगता घरून निघून गेला. यावेळी तो लाल रंगाची अॅक्टिव्हा क्र. एम.एच.३१/ ई.जी. ४२५४ ही दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. दुपारपर्यंत त्याचा पत्ता लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर नागपूर शहर पोलिसात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान दुचाकीवर जाताना त्याचे छायाचित्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्या आधारावर नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांनी तपासचक्र फिरविले. याबाबत सोशल मीडियावर देखील संदेश व्हायरल होऊ लागले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भिवापूर पोलिसांना सूचना केल्याने ठाणेदार महेश भोरटेकर यांनी राष्ट्रीय मार्गावर नाकाबंदी व तपासणी सुरू केली होती. अशातच सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ठाणेदार भोरटेकर यांना एका लाल रंगाच्या अॅक्टिव्हावर संशय आला. लागलीच त्याला थांबवून विश्वासात घेत विचारपूस केली. खात्री पटताच ठाणेदार भोरटेकर यांनी वरिष्ठांसह त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर तासाभरातच त्याचे पालक भिवापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. सारंगचा शोध लावल्याबद्दल पालकांसह वरिष्ठांनी भिवापूर पोलिसांचे कौतुक केले.
सावध अन् सतर्क
हायप्रोफाईल कुटुंबातील मुलगा असल्यामुळे पोलीस तेवढ्याच ताकदीने चौकस होते. दरम्यान लाल रंगाची अॅक्टिव्हा दिसली. मात्र त्याचा पाठलाग केल्यास अपघाताची भीतीसुद्धा होती. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीने काही अंतर प्रवास केला. यानंतर सदर युवकाला थांबविले. या संपूर्ण कारवाईत पोलीस सावध आणि सतर्क होते.