कॉटन मार्केटमध्ये पोलीस
By admin | Published: July 14, 2016 03:06 AM2016-07-14T03:06:43+5:302016-07-14T03:06:43+5:30
महात्मा फुले भाजी बाजारात (कॉटन मार्केट) बुधवारी पहाटे भाज्यांची दुप्पट आवक झाल्याने ग्राहकांना कमी दरात भाजीपाला उपलब्ध झाला.
नागपूर : महात्मा फुले भाजी बाजारात (कॉटन मार्केट) बुधवारी पहाटे भाज्यांची दुप्पट आवक झाल्याने ग्राहकांना कमी दरात भाजीपाला उपलब्ध झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला. कळमन्यात खरेदीसाठी जाणारे छोटे विक्रेते आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे दुपारी १२ पर्यंत संपूर्ण भाजीपाला संपला. दुपारनंतर पुन्हा सुरू झालेल्या बाजारात विक्रेते आणि ग्राहकांना जास्त भावात भाज्यांची खरेदी करावी लागली. बुधवारी पोलीस संरक्षणात भाज्यांची विक्री झाली.
भाज्यांचा मुबलक पुरवठा
महात्मा फुले भाजी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार असून येथील अडतियांनी शासनाच्या निर्णयाचे समर्थन करीत बाजार सुरू ठेवला. त्यामुळे शहरातील छोटे भाजी विक्रेते, घरगुती ग्राहक, हॉटेल्स यांना मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध झाला. पुढेही ताज्या भाज्या ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याची प्रतिक्रिया महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. शासनाच्या निर्णयाविरुद्ध कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डमधील सर्व बाजाराने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये महात्मा फुले भाजी बाजारातील (कॉटन मार्केट) अडतियांचा सहभाग नव्हता, हे विशेष.
‘कृउबास’चा सेस रद्द होणार
शासनाच्या निर्णयानंतर ग्राहकांना खरेदीवर सेस द्यावा लागणार नाही. त्यामुळे समितीला वर्षाला गोळा होणाऱ्या ३० ते ३५ कोटींच्या सेसवर पाणी सोडावे लागणार आहे. बंदमध्ये समितीचे काही संचालकसुद्धा सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)