गोंधळ घालणाऱ्या बायकर्सच्या ग्रुपला पोलिसांचा दणका
By योगेश पांडे | Published: April 1, 2024 09:26 PM2024-04-01T21:26:33+5:302024-04-01T21:27:00+5:30
११ बेजबाबदार चालकांवर गुन्हे दाखल : स्पोर्ट्स बाईक जप्त.
नागपूर : बेदरकारपणे वाहन चालवून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बायकर्सच्या ग्रुपवर सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली आहे. पोलिसांनी ११ स्पोर्ट्स बाईक जप्त केल्या असून त्यांच्या चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आरोपींमध्ये तेजस दादारावजी देवतळे (२९, महाजनवाडी, मानवता नगर, सेमिनरी हिल्स), वेदांत मुकेश मेहेर (१९, साई नगर, दर्शना सोसायटी), देवेंद्र नितीन तुगांर (२५, गायकवाड हाॅस्पीटलच्या मागे, सक्करदरा), पारिजात सुधिर सुरळकर (२७, सुरळकर हाउस कृषी नगर, दाभा), उत्कर्ष संजय बेलेवार (२२, गाडगे नगर), अनिकेत अशोक वाकडे (२३, मनीष नगर), नयन प्रमोद येवले (२०, गिरडकर ले आउट), स्वप्नील भिमराव गाठबैल (३१, खरबी रोड), आदित्य प्रकाश मदानी (१९, बैतुल, मध्यप्रदेश), ॲलेक्स मिलींद जिवने (१८, नारी रोड), औसाफ नबील शकील अहमद (३२, न्यू अहबाब काॅलोनी, जाफर नगर) यांचा समावेश आहे. औसाफ वगळता इतर सर्व बाइकर्स ग्रुपशी जुळलेले असून त्यांच्याकडे स्पोर्ट्स बाईक आहे. काही आरोपींनी दुचाकीच्या सायलेन्सरमध्येही बदल केले आहेत. फुटाळा तलाव मार्गावर शनिवार व रविवारी रात्री बेदरकारपणे वाहने चालवून ते गोंधळ घालतात. त्यांच्या दुचाकीच्या आवाजाने लोक घाबरतात. अनेक ठिकाणी अपघातही घडतात. लोकांच्या जिवाशी खेळत असल्याने सदर पोलिसांनी आरोपींना आधी सुधारण्याचा इशारा दिला होता. याचा कोणताही परिणाम न झाल्याने रविवारी रात्री सिव्हिल लाइन्स येथील शेतकरी भवनाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपींच्या ग्रुपला पोलिसांनी पकडले. सायलेन्सरमध्ये बदल केल्यामुळे पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेऊन आरोपीला पोलिस ठाण्यात आणले.
पोलीस बाईकर्स ग्रुपच्या दुचाकींची आरटीओकडून तपासणी करणार आहेत. त्याच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. सध्या भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस बाईकर्स ग्रुपच्या पालकांनाही बोलावणार आहेत. अपघात झाला की त्याची किंमत निष्पाप व्यक्तीला जीव देऊन चुकवावी लागते. फुटाळा परिसरात आरोपी दुचाकीस्वार अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करत होते. त्याच्याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या. पोलिस येण्यापूर्वीच आरोपी फरार होत होते. उपायुक्त राहुल मदने, सहायक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, अरुण क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.