पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या जळत्या पुतळ्याचे पोलिसाला बसले चटके; भाजयुमोचे नागपुरात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 08:11 PM2022-01-06T20:11:41+5:302022-01-06T20:12:33+5:30
Nagpur News नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह छन्नी यांचा पुतळा जाळण्यात आला. या पुतळ्याचे जळते अवशेष बंदोबस्तावर असलेल्या पोलीसाच्या अंगावर पडल्याने ते अंशतः भाजले गेले.
मुकेश कुकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवर देशभरातील राजकारण तापले आहे. याच घटनेचे पडसाद नागपुरातही उमटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या बडकस चौकात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह छन्नी यांचा पुतळा जाळण्यात आला. परंतु या आंदोलनामुळे विरोधकांच्या प्रतिमेला जाळ लागण्याऐवजी चक्क बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाच चटके बसले अन् आंदोलन आपल्या राज्यातील पोलिसांनाच जायबंदी करण्यासाठी होते की काय, अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली.
दुपारी साडेतीनच्या सुमारास बडकस चौकात भाजयुमोचे कार्यकर्ते जमले. यावेळी जवळील एका मंदिरात प्रार्थना करून आंदोलनाचा शंखनाद केला. आंदोलनाला परवानगी आहे की नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असतानाच पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांविरोधात निदर्शने सुरू केली. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा कार्यकर्ते करत होते. परिस्थिती पाहता तेथे पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता. अचानक काही कार्यकर्त्यांनी चरणजितसिंह छन्नी यांचा पुतळा आणला व त्यांच्याविरोधात घोषणा देत त्याला जाळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने पुतळा ताब्यात घेण्यासाठी धाव घेतली. या झटापटीत पुतळ्याचे जळते अवशेष पोलीस हेडकॉन्स्टेबल धर्मपाल वर्मा यांच्या अंगावर पडले. इकडे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती. वर्मा खाली पडले असताना पोलीस कर्मचाऱ्यांनीच त्यांना तातडीने उचलले व सर्व जळते साहित्य अंगावरून दूर सारले. या गोंधळात वर्मा यांच्या हाताला व शरीराला चटके बसले. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना नंतर विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही माहिती नव्हती.
आंदोलन की ‘कोरोना’ला निमंत्रण ?
राज्यातील सत्ताधारी नेते विनामास्क दिसले की, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल मीडियावर टीका करताना दिसून येतात. परंतु संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कोरोना नियमावलीदेखील जणू पुतळ्यासोबतच जाळल्या. बहुतांश कार्यकर्ते विनामास्क होते व फिजिकल डिस्टन्सिंग तर नावालादेखील नव्हते.