नागपुरात पोलीस-गुन्हेगारांचा ‘याराना’ : पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 09:46 PM2018-09-20T21:46:21+5:302018-09-20T21:47:49+5:30
कुख्यात गुन्हेगारांसह याराना दाखवत नाचगाणे करणाऱ्या पोलीस शिपायाच्या कृत्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुन्हेगारांसह याराना दाखवत नाचगाणे करणाऱ्या पोलीस शिपायाच्या कृत्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अनेक वादग्रस्त प्रकरणात नाव पुढे आल्याने चर्चेचा विषय ठरलेला पोलीस कर्मचारी जयंत शेलोट हा ताजबागमधील गुंड आबू, विदर्भात सर्वात मोठा जुगार अड्डा चालविणारा कुख्यात तडीपार अशोक बावाजी (यादव) आणि इतर काही गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा व्हीडीओ बुधवारी व्हायरल झाला. तेरे जैसा यार कहां... या गाण्यावर गुन्हेगार आणि पोलीस शिपायातील याराना व्हिडीओत दिसून येत असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रसारमाध्यमातून पोलीस आणि गुन्हेगारांमधील याराना आज प्रकाशित झाल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटली. पत्रकारांनी या संबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची गोची झाली. एकूणच प्रकाराची पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस कर्मचारी जयंत शेलोट आणि गुन्हेगारांमधील यारानाची चौकशी करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी सहायक आयुक्त राजरत्न बन्सोड यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
कधीची पार्टी, कधीचा व्हिडीओ
पोलीस आणि गुन्हेगाराच्या नाचगाण्याचा हा व्हिडीओ कुख्यात अबूच्या बर्थ डे पार्टीदरम्यानचा असल्याचे समजते. मात्र, ती पार्टी नेमकी कधी आणि कुठे होती. त्यात आणखी कोणते गुन्हेगार आणि किती पोलीस कर्मचारी होते, त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशी अहवाल दोन ते तीन दिवसात येण्याची शक्यता असून, त्यानंतर दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत आहे.
तडीपार बावाजीची नागपुरात मौजमजा
अशोक यादव उर्फ बावाजीविरुद्ध जुगाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अड्ड्यावर अनेकदा पोलिसांनी धाड टाकून पकडले आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. या व्हीडिओमध्ये बावाजीचीही उपस्थिती दिसते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. तडीपार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात हिट स्क्वॉडची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहे, हे येथे विशेष!