दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत २७ पर्यंत वाढ

By admin | Published: April 23, 2017 03:08 AM2017-04-23T03:08:59+5:302017-04-23T03:08:59+5:30

आमदारनिवास येथे झालेल्या एका १७ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोक्सोच्या विशेष न्यायाधीश माधुरी

Police custody of both the accused up to 27 | दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत २७ पर्यंत वाढ

दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत २७ पर्यंत वाढ

Next

आमदार निवासातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण
नागपूर : आमदारनिवास येथे झालेल्या एका १७ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोक्सोच्या विशेष न्यायाधीश माधुरी देशपांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ केली.
मनोज विनोद भगत (४४) रा. बोरगाव दिनशॉ फॅक्टरीच्या मागे आणि रजत तेजलाल मद्रे (१९) रा. राजनगर, अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरण असे की, १४ एप्रिल रोजी मनोज भगत हा पीडित मुलीच्या घरी गेला होता. मुलीला आपल्या कुटुंबीयांसोबत भोपाळला घेऊन जातो, असे त्याने तिच्या आईला सांगितले होते. प्रत्यक्षात मनोज भगतने तिला आपल्या एमएच-३१-ईके-५४०८ क्रमांकाच्या फोर्ट फिगो कारमध्ये बसवून आमदारनिवास येथे नेले होते. तेथील पार्किंगमध्ये कार उभी करून कारमध्ये अत्याचार केला होता. घटनेबाबत कुणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकीही त्याने दिली होती. भगतने रजत मद्रे याला आमदारनिवास येथे बोलावले होते. आरोपींनी विंग ए येथील ३२० क्रमांकाची खोली बुक करून १४ ते १७ एप्रिलपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते.
प्रारंभी पीडित मुलीच्या आईने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार केल्यावरून पोलिसांनी भादंविच्या ३६३ कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली होती. १७ रोजी पीडित मुलगी जयपूरला जाण्याच्या तयारीत असताना नागपूर रेल्वेस्थानकावर आढळली होती. तिने सांगितलेल्या कर्मकहाणीवरून पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून भादंविच्या ३७६ (डी), ३४, लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ३, ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. १८ एप्रिल रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांचा २२ एप्रिलपर्यंत तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला होता. पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्याने तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक शालिनी किनाके यांनी शनिवारी आरोपींना न्यायालयात हजर केले. आमदारनिवासाची खोली बुक करण्यास आरोपींना कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी मदत केली, आरोपींनी पीडित मुलीचे व्हिडिओ क्लिप तयार केले काय, रजत मद्रे हा १६ एप्रिलच्या रात्री आमदारनिवास सोडून पीडित मुलीला घेऊन रात्रभर कोणाच्या घरी राहिला, आदी मुद्यांबाबत तपास करण्यासाठी सरकार पक्षाने २८ एप्रिलपर्यंत आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली असता, न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Police custody of both the accused up to 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.