ग्वालबन्सीच्या साथीदारास ८ पर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Published: June 7, 2017 02:09 AM2017-06-07T02:09:46+5:302017-06-07T02:09:46+5:30
गोरेवाडा येथील ख्वाजा गरीब नवाज सोसायटीतील भूखंड हडपून मालकाला स्वत:च्या भूखंडाच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करून.......
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा येथील ख्वाजा गरीब नवाज सोसायटीतील भूखंड हडपून मालकाला स्वत:च्या भूखंडाच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याच्या एका साथीदारास ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
दयाशंकर जनार्दन पांडे (४४) रा. डहाके ले-आऊट गोधनी, असे आरोपीचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने दयाशंकर पांडे आणि त्याची पत्नी निर्मला पांडे (४०) यांना अटक केली.
प्रकरण असे की, गोधनी रोड सुमितनगर येथील रहिवासी मनोहर महादेवराव देऊळकर (६०) यांचा मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा गोरेवाडा येथील ख्वाजा गरीब नवाज को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या खसरा नंबर ८२/४ मध्ये २८ क्रमांकाचा भूखंड आहे. या भूखंडावर त्यांनी बांधकाम केलेले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये देऊळकर हे आपल्या घरी राहण्यास गेले असता दिलीप ग्वालबन्सी, दयाशंकर पांडे, त्याची पत्नी निर्मला पांडे आणि अन्य एका अनोळखी महिलेने त्यांना अडवले होते. त्यांना त्यांच्याच घरात शिरकाव करण्यास मज्जाव करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. देऊळकर यांनी २५ एप्रिल २०१७ रोजी मानकापूर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीवरून ग्वालबन्सी, पांडे दाम्पत्य आणि अनोळखी महिलेविरुद्ध भादंविच्या ३४१, ३५२, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(जी)(आर)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पांडे दाम्पत्य यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, तो फेटाळण्यात आला होता. सोमवारी विशेष तपास पथकाने दयाशंकर पांडे आणि मंगळवारी दुपारी निर्मला पांडे यांना अटक केली. या दोघांनाही तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी न्यायालयात हजर केले.
सरकार पक्षाने दयाशंकरचा १० जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मागितला तर त्याची पत्नी निर्मलाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची विनंती केली. बचाव पक्षाने दयाशंकरच्या पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून दयाशंकरला ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला तर निर्मलाला न्यायालयीन कोठडी सुनावली.
बचाव पक्षाच्या वकिलाने निर्मला पांडे हिचा जामीन अर्ज दाखल केला असता त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील अजय निकोसे तर बचाव पक्षाच्यावतीने अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.