पोलिसांनी मागितले हज हाऊसच्या फायर सिस्टीमचे प्रमाणपत्र : अपघाताची वर्तविली शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:11 PM2019-07-06T23:11:21+5:302019-07-06T23:12:44+5:30
हजयात्रा १८ जुलैला सुरू होत आहे. नागपूर, विदर्भासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरू आणि त्यांच्या सोबत अनेकजण भालदारपुरा येथील हज हाऊसमध्ये पोहोचतील. सकाळपासून रात्रीपर्यंत हज हाऊसमध्ये नागरिकांची गर्दी राहते. परंतु हज हाऊसची फायर सिस्टीम पूर्णपणे खराब आहे. अशा स्थितीत काही घटना घडल्यास त्यापासून बचाव करणे कठीण होईल. यामुळेच पोलीस विभागाने हज हाऊस व्यवस्थापन आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला नोटीस जारी करून फायर सिस्टीम दुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र मागितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हजयात्रा १८ जुलैला सुरू होत आहे. नागपूर, विदर्भासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरू आणि त्यांच्या सोबत अनेकजण भालदारपुरा येथील हज हाऊसमध्ये पोहोचतील. सकाळपासून रात्रीपर्यंत हज हाऊसमध्ये नागरिकांची गर्दी राहते. परंतु हज हाऊसची फायर सिस्टीम पूर्णपणे खराब आहे. अशा स्थितीत काही घटना घडल्यास त्यापासून बचाव करणे कठीण होईल. यामुळेच पोलीस विभागाने हज हाऊस व्यवस्थापन आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागाला नोटीस जारी करून फायर सिस्टीम दुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र मागितले आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्याने ही नोटीस पाठवून महापालिका आयुक्तांनाही सूचना दिली आहे. हजयात्रेपूर्वी प्रमाणपत्र न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे. हज हाऊसच्या खराब फायर सिस्टीमबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. दवा बाजारच्या इमारतीप्रमाणे हज हाऊसला आग लागल्यास आतील यात्रेकरू आणि त्यांच्या कुटुंबीयांना कसे वाचविता येईल? हा प्रश्न उपस्थित केला होता. सूत्रांनुसार वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलीस हज समितीकडून योग्य पाऊल उचलण्याची वाट पाहत होते. परंतु फायर सिस्टीममध्ये सुधारणा न केल्यामुळे पोलिसांनी फायर सिस्टीम नादुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र मागितले. आता याबाबत पोलीस ठाम असल्याचे दिसून येत आहे. नागपुरातून तीन हजारापेक्षा अधिक प्रवासी रवाना होतील. त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक हज हाऊसमध्ये येतील. पोलिसांनी ३१ मे रोजी दवा बाजाराच्या इमारतीला लागलेल्या आगीचा दाखला देत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपकरणे सुरू नसल्यामुळे दवा बाजारात आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते, असे म्हटले आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हज हाऊसमध्ये यात्रा सुरू होण्यापूर्वीच नागरिक पोहोचतात. येथे व्हिसासह आवश्यक प्रक्रिया होतात. त्यामुळे हज हाऊस व अग्निशमन विभागाने निरीक्षण करून फायर सिस्टीम सुरू असल्याचे प्रमाणपत्र देण्याची पोलिसांची मागणी आहे.
कायदेशीर कारवाई करणार
‘मागील महिन्यात हज हाऊसजवळील इमारतीत भीषण आग लागली होती. त्यात आगीवर नियंत्रण मिळविणारे उपकरणे काम करीत नव्हते. दुसऱ्या राज्यातून शेकडो नागरिक हज हाऊसमध्ये येतात. हे प्रकरण गंभीर आहे. याबाबत आम्ही हज हाऊस व्यवस्थापन व महापालिकेच्या अग्निशमन विभागाला नोटीस पाठवून फायर सिस्टीम व्यवस्थित करून नाहरकत प्रमाणपत्र मागितले आहे. प्रमाणपत्र न मिळाल्यास कायदेशीर कारवाई करणार.’
सुनील गांगुर्डे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेशपेठ पोलीस ठाणे
हज समितीला वारंवार दिली सूचना
‘हज हाऊसची फायर सिस्टीम खराब आहे. यात्रेच्या वेळी अस्थायी रुपाने व्यवस्था करण्यात येते. नासुप्रच्या मते पूर्ण यंत्रणा तयार करून दिली होती. देखभालीची जबाबदारी हज समितीकडे आहे. त्यामुळे वारंवार हज समितीला फायर सिस्टीम सुधारण्याची सूचना करण्यात आली. अनेकदा बैठकीतही सांगण्यात आले. परंतु आतापर्यंत फायर सिस्टीम दुरुस्त करण्यात आली नाही. त्यामुळे नाहरकत प्रमाणपत्र देणे शक्य नाही.’
राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, महानगरपालिका