घरफोडी करणारे अपघातामुळे सापडले पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:00 AM2019-05-14T01:00:20+5:302019-05-14T01:01:09+5:30

दारूच्या नशेत वाहन चालविताना झालेल्या अपघातामुळे घरफोडी व वाहन चोरी करणारे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, बाईक आणि दागिन्यांसह सहा लाखाचा माल जप्त केला.

Police detained burglary accused after met in accident | घरफोडी करणारे अपघातामुळे सापडले पोलिसांच्या हाती

घरफोडी करणारे अपघातामुळे सापडले पोलिसांच्या हाती

Next
ठळक मुद्देसीताबर्डी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत वाहन चालविताना झालेल्या अपघातामुळे घरफोडी व वाहन चोरी करणारे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. सीताबर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी त्यांच्याकडून कार, बाईक आणि दागिन्यांसह सहा लाखाचा माल जप्त केला. अजय ऊर्फ अज्जू रामसिंह वरखेडे (२३) रा. रामटेकेनगर आणि रोशन सुरेश पाचे (२३) रा. हिंंगणा, अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी १० मे रोजी रात्री बेलतरोडी येथील एका बंद घरातील कुलूप तोडून तेथील किमती वस्तू चोरल्या होत्या. त्यांना घरातून कारची चावीसुद्धा मिळाली होती. त्यामुळे चोरलेल्या वस्तू कारमध्ये ठेवून दोघेही फरार झाले. दोघेही नशेत होते. चोरलेल्या वस्तू त्यांनी बेलतरोडी येथील आपल्या एका मित्राच्या घरी लपवून ठेवल्या. तेथून ते कारने इतर ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशाने निघाले. मध्यरात्री ३.३० वाजता ते सीताबर्डीत पोहोचले. रोशन कार चालवीत होता. नशेत असल्याने त्याचे कारवर नियंत्रण नव्हते. दरम्यान, गस्त घालत असलेल्या सीताबर्डी पोलिसांना कारवर संशय आला. त्यांनी पाठलाग केला. पोलिसांपासून वाचण्यासाठी रोशनने कारची स्पीड वाढविली, परंतु त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. मानस चौकात त्याने एका पानठेल्याला धडक दिल्याने कार थांबली. पोलिसांनी रोशनला पकडले. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने आणि कारमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने पोलिसांनी रोशनला विचारपूस केली. तेव्हा त्याने बेलतरोडी येथे अज्जूसोबत मिळून चोरी केल्याचे कबूल केले. दरम्यान, रोशन पोलिसांच्या हाती लागताच अज्जू फरार झाला. पोलिसांनी त्यालाही शोधून अटक केली. त्याच्याजवळ धारदार शस्त्र सापडले.
दोघेही अनेक दिवसांपासून वाहन चोरी आणि घरफोडी करीत आहेत. तुरुंगात त्यांची मैत्री झाली होती. जामिनावर सुटून आल्यानंतर दोघेही मिळून चोरी करीत होेते. त्यांना दारूचे व्यसन आहे. दारू पिल्यावरच ते चोरी करतात. कार चालवताना अपघात झाल्याने दोघेही पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागले. आतापर्यंत केलेल्या विचारपूसदरम्यान त्यांनी एक घरफोडी आणि तीन ठिकाणी वाहन चोरल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई डीसीपी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जगवेंद्रसिंह राजपूत, एपीआय प्रवीण काळे, पीएसआय ए.पी. राऊत, के.आर. चौधरी, पोलीस शिपाई प्रफुल्ल मानकर, युवराज मोते, छन्ना मांडवकर, गणेश जोगेकर आणि पंकज निकम यांनी केली.

 

Web Title: Police detained burglary accused after met in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.