पोलिसांच्या चुकीची ‘त्याला’ मिळाली शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:31 PM2018-07-18T23:31:55+5:302018-07-18T23:34:40+5:30
स्थानिक रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रापूर शिवारात शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. पत्नीचा खून केला या प्रकरणात पोलिसांकडून एकाला गोवले जाऊन त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगीही करण्यात आली. मात्र त्यानंतर पत्नी जिवंत असल्याचे समोर येताच त्याला सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रापूर शिवारात शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. पत्नीचा खून केला या प्रकरणात पोलिसांकडून एकाला गोवले जाऊन त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगीही करण्यात आली. मात्र त्यानंतर पत्नी जिवंत असल्याचे समोर येताच त्याला सोडण्यात आले. त्याच्याविरुद्धची चार्जशिटही मागे घेतल्याची माहिती आहे. पोलिसांच्या चुकीमुळे एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा भोगावी लागली. त्यामुळे पोलिसांवरच कारवाई करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव उदयसिंह यादव यांनी केली आहे.
पोलिसांवरच कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंंडे आदींकडे सोपविले. दीपक जयदेव सोमकुवर (३५, रा. भागेमहारी) असे निर्दोष व्यक्तीचे नाव आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये शीर (मुंडके) नसलेल्या महिलेचा मृतदेह सत्रापूरनजीकच्या बोंदरी गावात आढळला. खून करून ओळख पटू न देण्याच्या इराद्याने करण्यात आलेल्या या कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी भांदविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृतदेहाच्या वर्णनावरून ती शिल्पा दीपक सोमकुवर (३२) असावी, असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी दीपक सोमकुवरला अटक केली. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले, त्यातून त्याने तिचा खून केला, असा बनाव पोलिसांनी केला. त्या प्रकरणात न्यायालयीन आदेशानुसार दीपकची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
मध्यंतरीच्या काळात शिल्पा सोमकुवर ही पोलिसांना जिवंत आढळली. दीपक आणि शिल्पा यांच्यामध्ये भांडण झाल्याने ती कामठी येथे तिच्या नातेवाईकाकडे वास्तव्यास होती. ती जिवंत आढळताच पोलिसांची भंबेरी उडाली. मुंडके नसलेला तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी दीपकला निर्दोष सोडले. परंतु त्याला या प्रकरणात नाहक गोवले गेले, शिक्षा भोगावी लागली. त्यामुळे दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी उदय यादव यांनी केली आहे.