फरार आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश नाही
By admin | Published: June 6, 2017 10:33 PM2017-06-06T22:33:13+5:302017-06-06T22:33:13+5:30
लष्करीबागेत रविवारी रात्री झालेल्या मोहम्मद आबिद जिमल अन्सारी (वय २४) याच्या हत्याकांडातील फरार आरोपींचा छडा लावण्यात
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 6 - लष्करीबागेत रविवारी रात्री झालेल्या मोहम्मद आबिद जिमल अन्सारी (वय २४) याच्या हत्याकांडातील फरार आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी कधी मौनीबाबाची भूमिका वठवितात. तर, कधी ठरवून ठेवल्याप्रमाणे पोलिसांना माहिती देत असल्याने प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही.
नेतागिरीचे पांघरून घेऊन गुन्हेगारीत सक्रीय असलेला सामी गुड्डू ऊर्फ आसिफ शेख याने आपल्या ८ ते १० सशस्त्र साथीदारांच्या मदतीने रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास डोबीनगरातील मोहम्मद आबिद जिमल अन्सारी याच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली होती. आबिद हा उत्तर नागपुरातील खतरनाक ईप्पा-नौशाद टोळीतील गुंड होता. या टोळीचा आरोपी गुड्डू ऊर्फ आसिफ शेख हा प्रतिस्पर्धी आहे. याने उत्तर नागपुरातील अवैध धंदे आणि खंडणी वसुलीसह लाखोंच्या भूखंडांवर, जमिनीवर कब्जा करण्यासाठी या दोन्ही टोळळ्या सक्रिय आहेत. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते एकमेकांच्या कारवायांमध्ये हस्तक्षेप करतात. त्यातून त्यांच्यातील वाद तीव्र झाला असून या वादातूनच रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास गुंडांच्या या दोन परस्पर विरोधी टोळ्या नवा नकाशा परिसरात किदवई ग्राऊंडजवळ समोरासमोर आल्या. त्यांनी जोरदार सशस्त्र हाणामारी केली. यावेळी आसिफने पिस्तूल काढले आणि आबिदच्या डोक्यात गोळी घातली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्लयात आसिफचा साथीदार कोयला उर्फ आसिफ काल्या आणि समीरसुद्धा जखमी झाला. काल्याच्या हाताला तर, सामीच्या पायाला गोळीची जखम झाली. या गोळळ्या आबिदच्या साथीदारांनी झाडल्याचा त्यांनी आरोप लावला आहे. मात्र, बंदुकीच्या गोळळ्या दोघांनाही चाटून गेल्यासारख्या दिसत असल्याने त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना अडकवण्यासाठी स्वत:च स्वत:ला मारल्या असाव्या, असा संशय आहे. त्यांची जखम जुजबी आहे. दरम्यान, आसिफ, कोयला आणि समीर या तिघांची ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी असून, त्यांच्याकडून फरार साथीदारांची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र, पोललिसांना हवी असलेली माहिती आरोपी देत नाही.
सेठची भूमिका संशयास्पद -
गुन्हेगारांचा आश्रयदाता, अन् मांडवलीकार म्हणून गुन्हेगारी वर्तुळात ओळखला जाणारा कामठीचा सेठ या प्रकरणात संशयास्पद भूमीका वठवित आहे. आबिदच्या हत्याकांडानंतर आरोपी त्याच्याकडेच गेले होते. त्याने दिलेल्या दिशानिर्देशानंतर ते विशिष्ट ठिकाणी निघून गेले. पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी कामठीत गेले होते. मात्र, त्यांनी सेठची काय चौकशी केली ते कळायला मार्ग नाही.
आरोपींवर मोक्का लागणार-
हे हत्याकांड संघटीत गुन्हेगारीचा भाग आहे. त्यातून आपल्या टोळीची दहशत आसिफला तयार करायची आहे, हे जवळपास स्पष्ट झाल्यामुळे पोलीस फरार आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यासंबंधाने आवश्यक पुराव्याची साखळी जोडण्याचे काम सुरू असल्याचेही सहआयुक्त बोडखे यांनी सांगितले आहे.