पोलीस ‘दीदीं’कडून गुड टच, बॅड टचचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 10:31 AM2021-10-31T10:31:06+5:302021-10-31T11:07:47+5:30
महिला-मुलींवरील अत्याचार रोखण्याकरता तथा, जवळीक साधणाऱ्या आरोपींची देहबोली कशी ओळखायची त्यासंबंधीचे धडे शहरातील महिला-मुलींना दिले जात आहेत. त्यासाठी महिला पोलिसांचे एक वेगळे दल निर्माण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - महिला-मुलींवरील अत्याचार रोखण्यासंबंधाने ‘त्यांना’ कसे जागरूक ठेवायचे, आरोपी वेगवेगळ्या निमित्ताने अंगाला स्पर्श करतात. त्यातील चांगला कोणता आणि वाईट कोणता, ते कसे ओळखायचे, याबाबतचे मार्गदर्शन पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी गवळीपुऱ्यातील महिला-मुलींना केले.
महिला-मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे सर्वत्र वाढत आहेत. प्रारंभी जवळीक साधणारे आरोपी नंतर संधी मिळताच बलात्कार, विनयभंग करतात. ते होऊ नये, जवळीक साधणाऱ्या आरोपींची देहबोली कशी ओळखायची त्यासंबंधीचे धडे शहरातील महिला-मुलींना दिले जात आहेत. त्यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाने महिला पोलिसांचे एक वेगळे दल निर्माण केले असून या दलाला ‘दीदी’ नाव देण्यात आले आहे.
महिला पोलिसांच्या रुपातील दीदी (बहीण) शहरातील वेगवेगळ्या भागात महिला-मुलींच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहे. वेगवेगळ्या कारणामुळे जवळ आलेल्या पुरुषांनी स्पर्श केला तर तो चांगला (गुड) की वाईट, (बॅड) तो कसा ओळखायचा याबाबतही माहिती दिली जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता गवळीपुरा धरमपेठ परिसरात जागरुकता बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला या भागातील महिला-मुलींची उल्लेखनीय उपस्थिती होती. पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिला-मुलींकडून अनेक प्रश्न
स्वत:चे संरक्षण कसे करायचे, सायबर गुन्हेगारांपासून दूर कसे राहायचे, रस्त्यावर होणारे गुन्हे कसे रोखायचे, यासंबंधी उपायुक्त साहू यांनी महिला-मुलींना मार्गदर्शन केले. यावेळी महिला-मुलींनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली.