नागपुरातील कथित गोळीबाराने पोलिसांची दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:32 PM2019-01-03T23:32:03+5:302019-01-03T23:33:08+5:30
जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील उप्पलवाडी भागात कारमधून आलेल्या गुंडांनी गोळीबार केल्याची बतावणी करून एका तरुणाने शहर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडविली. दाणादाण उडालेले पोलीस तब्बल तीन तास धावपळ करीत राहिले आणि नंतर गोळीबाराची तक्रार करणाऱ्याने त्याच्याशी पटत नसल्यामुळे त्या तरुणांना फसविण्यासाठी ही क्लृप्ती केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
इंडिगो कारमधून आलेल्या चार ते पाच गुंडांनी उप्पलवाडीत येऊन पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्याची माहिती फिरोज खान नामक तरुणाने जरीपटका पोलिसांना कळविली. त्यापूर्वी त्याने ही माहिती नियंत्रण कक्षातही दिली. यावेळी पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस जिमखान्यात वार्षिक गुन्ह्यांचा आढावा घेत होते. हे वृत्त कळताच परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार आणि जरीपटका तसेच गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा उप्पलवाडीत पोहचला. त्यांनी फोन करणाऱ्या फिरोज खानला शोधून काढले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी पोहचले. आरोपींनी चार गोळ्या झाडल्याचे फिरोज सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी तेथे रिकाम्या पुंगळ्या शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, काडतुसाची एकही पुंगळी पोलिसांना आढळली नाही. त्यामुुळे आजूबाजूच्या मंडळींना पोलिसांनी विचारपूस केली. कुणीच असे काही घडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी फिरोजने सांगितलेल्या विलास नामक तरुणाला आणि साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी घटनेच्या वेळी आपण दुसऱ्याच भागात कामावर होतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीतून गोळीबाराची शहानिशा केली. मात्र, त्यातही काहीच आढळले नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांनी फिरोजलाच त्यांच्या पद्धतीने बोलते केले. सुरुवातीला विसंगत माहिती देणारा फिरोज अखेर खरे बोलला. असे काही झालेच नाही. ज्यांनी गोळीबार केला, असे सांगितले त्या तरुणांसोबत आपले पटत नाही. ते आपल्याला त्रास देतात. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी आपण गोळीबाराची खोटी तक्रारवजा माहिती पोलिसांना दिल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, गोळीबार घडलाच नाही. कांगावा करणाऱ्या फिरोजने त्याच्याशी रात्री दारूच्या नशेत विलास आणि सोनूसोबत वाद झाला. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी हा उपद्रव करून पोलीस यंत्रणेची तारांबळ उडवून दिल्याची माहिती जरीपटका पोलिसांनी वरिष्ठांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी फिरोजवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.