न्याय्य मागण्यांसाठी पोलिसांचे कुटुंब रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:59 PM2017-12-19T22:59:03+5:302017-12-19T23:00:20+5:30
महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या लावून धरल्या.
आॅनलाईन लोकमत
नागपूर :महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या लावून धरल्या.
राष्ट्रनिर्माण संघटन, पोलीस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र पोलीस परिवार व पोलीस मित्र न्याय हक्क संघर्ष समिती, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन मुंबई, महाराष्ट्र पोलीस व गृहरक्षक कुटुंब दल संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अनेक पोलिसांचे अख्खे कुटुंबच सहभागी झाले होते. विशेषत: महिलांची व लहान मुलांची संख्या मोठी होती. विशेष म्हणजे, मागण्यांचे निवेदन देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री उपलब्ध न झाल्याने रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत मोर्चा रस्त्यावर थांबून होता. या मोर्चाचे नेतृत्व नीलेश नागोलकर, विजय मारोडकर, प्रशांत भारती, ओम जयस्वाल, मिलिंद सोनुने आदींनी केले. महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्याधर्तीवर पोलिसांना वेतन द्या, पोलिसांच्या कामाचे तास आठ तास करा,आठ तासांच्यावर काम झाल्यास ओव्हरटाईम व भत्ते द्या, लोकसंख्येच्या तुलनेत किमान १ टक्का मनुष्यबळ भरती करा, पदानुसार ६५० ते १२५० स्के. फूटाचे क्वॉटर्स द्या, इमारत देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपवा आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.