पोलिसांवरून उडाला खबऱ्यांचा विश्वास
By admin | Published: September 15, 2016 02:42 AM2016-09-15T02:42:48+5:302016-09-15T02:42:48+5:30
पोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते.
आपसी प्रतिस्पर्धा : वापर होत असल्याने बसले शांत
जगदीश जोशी नागपूर
पोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते. त्यांच्या माहितीच्या आधारावर पोलीस मोठमोठ्या प्रकरणांचा उलगडा करतात. तसेच अनेक गुन्हेगारांचे ‘प्लॅन’ फेल पाडले जातात. परंतु मागील काही दिवसांपासून पोलिसांवरून खबऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. खबऱ्यांच्या विरोधातील कारवाई, खून आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धा याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांचे बहुतांश खबरे हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेच असतात. गुन्हेगारी सोडल्यानंतर पोलीस अशा लोकांचा वापर करीत असतात. गुन्हेगारी लोकांशी असलेले संबंध, संपर्क आणि अनुभवामुळे त्यांना गुन्हेगारी जगताची माहिती मिळत असते. याच माहितीसाठी पोलीसही त्यांना योग्य परतावा देत असते. सण-उत्सवादरम्यान खबऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यकतेकडेही पोलिसांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अनेकदा छोटा-मोठा मटका किंवा जुगार अड्डा चालवण्याची खबऱ्यांना पोलिसांची मूक सहमती असते.
त्यामुळेच खबरे आपल्या जीवावर उदार होऊन गुन्हेगारी जगताची माहिती मिळवित असतात. परंतु मागील काही दिवसांपासून खबऱ्यांचा अभाव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धेमुळे परिस्थिती खराब झाली आहे. पोलीस ठाण्यातील डीबी (डिटेक्शन) ची वेगवेगळी चमू असते.
तपासात यश मिळविण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा असते. अशा वेळी एखाद्या खबऱ्याने एका चमूला माहिती दिली तर दुसरी चमू नाराज होते. यातूनच खबऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते. एकीकडे पोलीस कारवाई होत आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारांकडूनही त्यांना धोका आहे. त्यामुळे खबरे मागील काही दिवसांपासून शांत बसले आहेत.
म्हणून माहिती मिळाली नाही
नागपूर : गेल्या ९ सप्टेंबर रोजी खंडणी वसुलीवरून सक्करदरा येथील बुधवार बाजारात कुख्यात गुन्हेगार आशिष राऊत मारला गेला. तो दीड महिन्यापूर्वीच तुरुंगातून सुटला. तेव्हापासून तो या परिसरात दहशत पसरवत होता. बुधवार बाजारात पोलिसांची नेहमी गस्त असते. परंतु खबऱ्यांचे नेटवर्क नसल्याने पोलिसांना दीड महिन्यांपासून सुरूअसलेल्या या प्रकरणाची माहितीच मिळाली नाही.