सना खान हत्याकांडात पोलिसांना मिळाली महिला साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 11:15 AM2023-09-06T11:15:57+5:302023-09-06T11:18:11+5:30
फॉरेन्सिक पुराव्यांवर पोलिसांची भिस्त
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात नागपूर पोलिसांकडून अजूनही विविध मार्गांनी ‘लिंक्स’ शोधण्यात येत आहेत. जबलपूरला गेलेल्या नागपूर पोलिसांच्या पथकाला या प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार सापडली आहे. आरोपी अमित साहूच्या घराजवळील एका महिलेने हत्येच्या दिवशी तिचा मृतदेह पाहिला होता. यासंदर्भात तिने पोलिसांना बयाण दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी युद्धपातळीवर मृतदेहाचा शोध केला. मात्र हिरन नदी व नर्मदा नदीला त्यावेळी पूर आला होता. त्यामुळे मृतदेह दूरवर वाहून गेल्याची किंवा गाळात फसल्याची शक्यता आहे. पोलिसांनी विविध गावांमध्येदेखील विचारपूस केली. तपासादरम्यान अमित साहूच्या घरी २ ऑगस्ट रोजी कोण कोण आले होते, याची चौकशी करण्यात आली. सकाळच्या सुमारास साहूच्या शेजाऱ्यांनी भांडणाचे आवाज ऐकले होते. तर सना यांची हत्या झाल्यावर काही वेळाने साहूची संबंधित महिला त्याच्या घरी पोहोचली होती. तिने दरवाजा वाजविला, मात्र साहूने तो उघडला नाही. महिलेने खिडकीच्या फटीतून आत पाहिले असता, तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सनाचा मृतदेह दिसल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.
पोलिसांच्या दृष्टीने हा मोठा पुरावा आहे. यासोबतच फॉरेन्सिक तपासादरम्यान अमित साहूचे घर, त्याच्या घराचा सोफा, त्याची कार यावर रक्ताचे डाग मिळाले आहेत. सना यांच्या कुटुंबीयांशी डीएनए मॅच करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘दृश्यम’स्टाईल ‘थिअरी’त तथ्य नसल्याची भूमिका
सना यांचा मृतदेह आढळत नसल्याने तो अमितने जाळला किंवा दुसरीकडे गाडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी पाचही आरोपींची कसून चौकशी केली. त्यांच्या बयाणाचा अभ्यासदेखील करण्यात आला. या ‘थिअरी’त फारसे तथ्य नसल्याची पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळेच नदीतच सना यांचा मृतदेह शोधण्यावर भर देण्यात आला.