पोलिसांची प्रतिमा बदलायची आहे
By admin | Published: May 13, 2017 02:41 AM2017-05-13T02:41:36+5:302017-05-13T02:41:36+5:30
आम्ही रोज एसी केबिन आणि गाडीमध्ये बसून पाहतो, त्यापलिकडे आपला समाज काय आहे, कसा आहे, ते पाहणे आवश्यक आहे.
‘मी पोलीस कमिश्नर...’ : व्यंकटेशम यांचा विश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आम्ही रोज एसी केबिन आणि गाडीमध्ये बसून पाहतो, त्यापलिकडे आपला समाज काय आहे, कसा आहे, ते पाहणे आवश्यक आहे. पोलिसांवर अनेक टीका होतात. शंका उपस्थित होतात. आक्षेप घेतात. मात्र पोलिसांमध्ये सर्वच वाईट आहेत, असे नाही. अनेकजण चांगले आहेत, म्हणूनच संपूर्ण व्यवस्था टिकून आहे. परंतु तरी पोलिसांविषयी समाजात जो गैरसमज निर्माण झाला आहे ती प्रतिमा बदलण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार, असा विश्वास शहर पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी व्यक्त केला.
विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्राच्यावतीने ‘मी पोलीस कमिश्नर...’ या विषयावर शुक्रवारी आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. शंकरनगर चौकातील बाबुराव धनवटे सभागृहात हा कार्यक्र्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. एस. सिरपूरकर होते. अतिथी म्हणून कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, सामाजिक कार्यकर्ते रणजित मेश्राम, उद्योजक झामीन अमीन, कवी डॉ. सागर खादीवाला, लेखिका सुप्रिया अय्यर व गौरी पाटील उपस्थित होत्या.
यावेळी प्रत्येक वक्त्यांनी आपण एक दिवसाचे ‘पोलीस कमिश्नर’ म्हणून विचार व्यक्त केले. त्या सर्व वक्त्यांच्या मनातील भावना ऐकल्यानंतर शहराचे खरेखुरे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, शहरात प्रथमच ‘भरोसा सेल’ सुरू करण्यात आला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भावनिक कार्यक्रम राबविला जात आहे. यातून परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजातील संपूर्ण गुन्हेगारी रोखायची असेल, तर हे केवळ पोलिसांनी होणार नाही, त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील.
पोलीस म्हणजे, वेगळे नाही. तो सुद्धा समाजाचाच एक घटक आहे. नागपूर शहर राज्यात एक ‘मॉडेल’ म्हणून कसे तयार होईल. यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांना सोईसुविधा मिळाव्या : सिरपूरकर
निवृत्त न्यायामूर्ती व्ही. एस. सिरपूरकर म्हणाले, जोपर्यंत पोलिसांना आवश्यक सोईसुविधा मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून मोठमोठ्या अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. आज पोलिसांना राहायला घरे आहेत का, त्यांना पगार किती मिळतो, याचाही विचार झाला पाहिजे. परंतु त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. अशा स्थितीत आपण त्यांच्याकडून इंग्लंड आणि अमेरिकेतील पोलिसांप्रमाणे वागणूक मिळावी, अशी अपेक्षा करतो. ते शक्य नाही. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम तशी प्रतिष्ठा आणि सोई द्याव्या लागतील, असेही ते म्हणाले. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, पोलीस हा शब्द आठवताच मनात एक आदरभाव तयार झाला पाहिजे, परंतु सद्यस्थिती पाहता मनात भीतीचा भाव येतो. पोलीस व समाज एक दुसऱ्यांचे अविभाज्य अंग आहेत. त्यामुळे पोलीस अपयशी ठरत असेल तर ते समाजाचे सुद्धा अपयश ठरते, असेही ते म्हणाले.