पोलिसांनी उद्ध्वस्त केले नागपुरातील गुन्हेगारांचे अड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 11:53 PM2019-10-04T23:53:10+5:302019-10-04T23:55:26+5:30
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी झोन क्रमांक ४ अंतर्गत इमामवाडा, सक्करदरा, नंदनवन, अजनी तसेच हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. निवडणुक समोर असल्यामुळे सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरात ठिकठिकाणी पानठेले, आमलेट आणि चायनीजचे ठेले आहेत. हे ठेले गुन्हेगारांशिवाय दारुड्यांची पसंतीची बैठक आहे. अनेक खाद्यपदार्थ विक्रेता दारुचीही विक्री करतात. येथे दारू पिताना अनेक गुन्ह्यांच्या योजना आखल्या जातात. स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक त्यांच्या विरुद्ध कारवाई करीत नाही. यामुळे गुन्हेगार बिनधास्तपणे येथे वावरतात. परंतु काही घटना घडल्यानंतर पोलिसांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. अनेक घटनांमध्ये ही बाब समोर आली आहे. यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक अतिक्रमण पथकाच्या मदतीने कारवाई करीत आहे. गुरुवारी सायंकाळी सक्करदरा ठाण्यांतर्गत ताजाबाद येथून कारवाईला सुरुवात झाली. ताजाबादमध्ये कुख्यात गुन्हेगार आबू खानचा भाऊ शेख फारूकने रस्त्याच्या कडेला शासकीय जमिनीवर मोठमोठे पानठेले तयार केले होते. पोलिसांनी दोन्ही पानठेल्यांना उद्ध्वस्त करून सामान जप्त केले. आबू एमडीच्या तस्करीत तुरुंगात आहे. एमडी तस्करी जारी असल्याच्या माहितीमुळे पोलिसांनी पानठेला त्वरित हटविण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांची स्तुती केली आहे. सक्करदराच्या माटे वाईन शॉपजवळील हातठेल्यावर मद्यपींची गर्दी राहते. तेथेही ठेले हटवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नंदनवनमध्ये गुरुदेवनगर चौक येथील स्वराज वाईनशॉपजवळ बंद दुकानासमोर ग्राहक दारु पित होते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी अनेक ठिकाणी करून अतिक्रमणधारकांना पळवून लावले. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे. या अड्ड्यांमुळे महिलांना खूप त्रास होत होता. यामुळे त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सत्यवान माने, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, किरण चौगुले, सहायक उपनिरीक्षक रमेश उमाठे, हवालदार देवेंद्र चव्हाण, सचिन तुमसरे, श्रीकांत मारवाडे यांनी केली.
कारवाई सुरु राहणार
गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले की, अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. निवडणुक पुढे असल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरु केली आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारांवर मोठा परिणाम होणार आहे. गुन्हे शाखेचा पदभार सांभाळल्यानंतर राजमाने यांनी अनेक बदल घडविले आहेत.