राज्यातील पोलिसांना २८ जानेवारीपर्यंत मिळणार नाही सुट्टी! कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश
By नरेश डोंगरे | Published: January 20, 2024 08:42 PM2024-01-20T20:42:24+5:302024-01-20T20:43:11+5:30
गृह खात्याचा हवाला देत तशा प्रकारचे आदेश पोलीस महासंचालनालयाने शुक्रवारी जारी केले आहे.
नागपूर : आजपासून पुढच्या २८ तारखेपर्यंत राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय रजा वगळता कुठल्याही सुट्या मिळणार नाहीत. गृह खात्याचा हवाला देत तशा प्रकारचे आदेश पोलीस महासंचालनालयाने शुक्रवारी जारी केले आहे.
सोमवारी २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. त्यामुळे रामभक्तांकडून राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढच्या काही तासांत ठिकठिकाणच्या धार्मिक स्थळांवरची गर्दी वाढणार आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळाही चार दिवसांवर आला आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळणार, अशी माहिती राज्य पोलिस दलाला आधीच गुप्तचर खात्याकडून मिळालेली होती.
जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे. कुठल्याच ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. त्यासाठी जागोजागच्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांचे मोठे मणूष्यबळ हाताशी ठेवावे लागणार आहे. ते लक्षात घेता पोलीस महासंचालनालयाने गृह खात्याच्या निर्णयाचा हवाला देत शुक्रवारी एक आदेश जारी केला. विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशपत्रात राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्यांसह सर्व प्रकारच्या (वैद्यकीय वगळता) सुट्या बंद करण्याचे आदेश दिले आहे.
हे आदेश देतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले आहे. सर्व पोलीस आयुक्तालये,गुप्तवार्ता विभाग, राज्य राखीव पोलीस दल, नक्षल विरोधी अभियान, विशेष कृती दलासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून शनिवारी सकाळी संबंधित पोलिसांना या आदेशाची माहिती देण्यात आली आहे. २० ते २८ जानेवारीपर्यंत कुणालाच सुटी घेता येणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकांसह गर्दीच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त -
विविध मार्गावरील रेल्वेगाड्या सध्या प्रवाशांनी भरभरून धावत आहेत. रेल्वे स्थानकासह बसस्थानकांवरचीही गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या मुख्य आणि अजनी स्थानकावर तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. श्वान पथकांसह, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकही आजपासून २४ तास कर्तव्यावर राहणार आहे. सीसीटीव्ही माध्यमातून संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरावर नजर ठेवली जात आहे. संशयीतांची कसून तपासणी केली जात आहे.