पोलिस निरीक्षक धनंजय सायरेंना अंतरिम अटकपूर्व जामीन नाहीच
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 31, 2024 05:53 PM2024-05-31T17:53:48+5:302024-05-31T17:53:48+5:30
हायकोर्ट : नागपुरात तरुणीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेले अकोला येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय महादेव सायरे (५६) यांची अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अमान्य केली. न्यायालयाने केवळ राज्य सरकारला नोटीस बजावली व सायरे यांच्या जामीन अर्जावर येत्या १३ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सायरे अकोलामधील खदान पोलिस ठाण्यात कार्यरत होते. या गुन्ह्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध नागपुरातील नंदनवन पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गेल्या १८ मे रोजी विनयभंगासह इतर संबंधित गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पीडित तरुणीचे वडील पोलिस खात्यात आहेत. त्यामुळे सायरे यांचे तरुणीच्या घरी येणे-जाणे होते. त्यातून त्यांची तरुणीसोबत चांगली ओळख झाली. तरुणीला पोलिस अधिकारी व्हायचे असून यासाठी ती नंदनवन येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.
सायरे हे विविध कारणांनी सतत तरुणीच्या संपर्कात राहत होते. तिच्यासोबत अश्लील बोलत होते. दरम्यान, १८ मे रोजी त्यांनी तरुणीचा विनयभंग केला, असा आरोप आहे. सायरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज गेल्या २२ मे रोजी फेटाळण्यात आला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सायरे यांच्यातर्फे ॲड. विलास डोंगरे व ॲड. राजू कडू यांनी कामकाज पाहिले.