पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी अवैध कारवाई केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:23+5:302021-03-22T04:07:23+5:30
नागपूर : एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे व सहायक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी प्रॉपर्टी एजन्ट प्रमोद डोंगरे यांच्यासोबत ...
नागपूर : एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे व सहायक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी प्रॉपर्टी एजन्ट प्रमोद डोंगरे यांच्यासोबत मिळून प्रॉपर्टी डिलर सुकुमार बेलेकर यांच्यावर अवैध कारवाई केली, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. त्यात उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांसह हांडे, डोंगरे व हत्तीगोटे यांना नोटीस बजावून, ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
ही याचिका बेलेकर यांनी दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २१ जानेवारी २०२१ रोजी एमआयडीसी पोलिसांनी डोंगरे यांच्या तक्रारीवरून बेलेकर यांच्याविरुद्ध खंडणी मागण्यासह इतर संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. ही कारवाई बेकायदेशीररित्या करण्यात आली, असा बेलेकर यांचा आरोप आहे. हा एफआयआर रद्द करण्यात यावा, प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त श्रेणीच्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात यावा आणि हांडे व हत्तीगोटे यांची चौकशी करून त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी विनंती बेलेकर यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. राजेश नायक यांनी कामकाज पाहिले.