पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By admin | Published: May 25, 2016 02:59 AM2016-05-25T02:59:07+5:302016-05-25T02:59:07+5:30
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८७३ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्यांची यादी मंगळवारी सायंकाळी पोलीस महासंचालनालयातून जारी झाली.
नागपुरातील १८ : ग्रामीणमधील २०
नागपूर : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८७३ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्यांची यादी मंगळवारी सायंकाळी पोलीस महासंचालनालयातून जारी झाली. त्यात नागपुरातील ३८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
मेच्या तिसऱ्या किंवा अखेरच्या आठवड्यात पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी होते. त्यामुळे दोन महिन्यांपासूनच अनेक जुगाडू अधिकारी मुंबईत चकरा मारत होते. त्यातील काहींना आपल्या मनासारखे ठिकाण मिळवून घेण्यात यश आले तर काहींची मात्र साफ निराशा झाली.
राज्यातील ४३८ पोलीस निरीक्षकांच्या यादीत नागपुरातील १८ निरीक्षकांची नावे आहेत. त्यात प्रामुख्याने आजी माजी ठाणेदार असलेल्या अरुण जगताप, राजा पवार, खताळे आणि भापकर यांचाही समावेश आहे. नागपूर ग्रामीणमधून हेमंतकुमार खराबे, अरुण गोवेकर, कैलास तानकर यांचीही बदली झाली असून, त्यातील खराबे यांना तीन दिवसांपूर्वीच हिंगण्याचे ठाणेदार म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) राजेश दुद्धलवार यांचीही नागपूर शहरात बदली झाली आहे. बदलीच्या यादीनुसार, एसीबीचे दिनकर सावरकर, किशोर सुपारे हे देखील शहरात येत असून, लोहमार्ग पोलीस तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंकुश पिंपरेसह तीन अधिकारी शहर पोलीस दलात रुजू होणार आहे. त्याचप्रमाणे शहर आणि ग्रामीणमधील २० सहायक निरीक्षकांची देखील बदली झाली आहे. (प्रतिनिधी)