पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर रोखली जलसंघर्ष यात्रा, आमदार नितीन देशमुखांना कार्यकर्त्यांसह घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:22 PM2023-04-20T12:22:28+5:302023-04-20T12:57:49+5:30
बुधवारी संघर्ष पदयात्रा नागपूरच्या वेशीवर असलेल्या वडधामणा येथे पोहोचली, २१ एप्रिल रोजी ही यात्रा नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर धडकणार होती.
नागपूर : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर अडवून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आमदार देशमुख यांनी अकोला-अमरावतीच्या खारपट्ट्यातील पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली होती. देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसह अकोल्याहुन नागपूरच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांच्या यात्रेला नागपूरच्या वेशीवरच रोखण्यात आलं असून त्यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.
आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वात १० एप्रिलपासून अकोला येथून जलसंघर्ष यात्रा सुरू झाली होती. अकोला ते नागपूर निघालेली ही पायी यात्रा उद्या फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी धडकणार होती. पाण्यासंदर्भातील समस्येवरून देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे जाऊन आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'सरकार जनतेलाच घाबरू लागले' म्हणत ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे.
पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 20, 2023
आमदार नितीन देशमुखना अटक झाली.नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले.
खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या.महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली
सरकार जनतेलाच घाबरु लागले!
नितीन देशमुख म्हणाले..
पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली व माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.