आधी खाल्ली पोलिसांची नोकरी आता खाल्ले खिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:15+5:302021-01-25T04:08:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चाैकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी यापूर्वी एका सराईत गुन्हेगाराने पोलीस कस्टडीतून पलायन करून दोन पोलिसांची ...

The police job that was eaten before is now eaten | आधी खाल्ली पोलिसांची नोकरी आता खाल्ले खिळे

आधी खाल्ली पोलिसांची नोकरी आता खाल्ले खिळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - चाैकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी यापूर्वी एका सराईत गुन्हेगाराने पोलीस कस्टडीतून पलायन करून दोन पोलिसांची नोकरी खाल्ली. आता पोलिसांच्या कस्टडीत त्याने चक्क खिळे खाऊन परत एकदा पोलिसांची कोंडी करण्याचा डाव टाकला. ९ महिन्यात दुसऱ्यांदा पोलिसांची तारांबळ उडवून देणारा हा सराईत गुन्हेगार पारडीत राहतो. नरेश महिलांगे (वय २६) असे त्याचे नाव आहे.

घरफोडी करण्यात सराईत असलेला महिलांगे काहीसा विक्षिप्त आहे. पोलिसांच्या चाैकशीला चुकविण्यासाठी तो वेळोवेळी वेगवेगळी शक्कल लढवतो. एप्रिल २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवून दिल्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या गावात अडकले. त्या घरमालकांच्या दाराचे कुलूप तोडून आरोपी महिलांगे रोख आणि नगदी पळवू लागला. हुडकेश्वर पोलिसांनी त्याला अटक केली. चाैकशीत तो कोरोनाबाधित असल्याचे समजल्याने त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. त्याला पकडून आणणारे, पोलीस ठाण्यात त्याच्या संपर्कात आलेले आणि त्याची चाैकशी करणारे हुडकेश्वरचे पोलीस या सर्वांमध्ये त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती. त्यावेळी त्यांची कोरोना टेस्ट करून घेण्यात आली. त्यातील एक जण पॉझिटिव्ह आल्याने त्यावेळी पोलिसांना चांगलीच धडकी भरली होती.

दरम्यान, मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या महिलांगेवर नजर ठेवण्यासाठी दोन पोलीस नियुक्त करण्यात आले होते. त्यांना गुंगारा देऊन महिलांगे मेडिकलमधून पळून गेला. त्याच्या पलायनामुळे कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपाखाली त्या दोन पोलिसांना नोकरीतून निलंबित करण्यात आले. पोलिसांची नोकरी खाणारा महिलांगे फरार होऊन शहरात घरफोडी करत सुटला. त्याने ९ महिन्यात १८ घरफोड्या केल्या. दोन आठवड्यांपूर्वी गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. १४ जानेवारीला त्याला लकडगंज पोलिसांच्या हवाली करण्यात आले. एका गुन्ह्यात पीसीआर संपल्यानंतर लकडगंज पोलिसांनी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून त्याचा पुन्हा पीसीआर मिळवला. दरम्यान, कोणत्याही दाराचे कुलूप कोंडा, स्क्रू तोडण्यात वस्ताद असलेल्या कुख्यात महिलांगेने शनिवारी दुपारी राज्यातील सर्वात स्मार्ट पोलीस स्टेशन समजल्या जाणाऱ्या लकडगंज पोलीस ठाण्यातही हातचलाखी दाखवली. त्याने एका दाराचे तीन ते चार स्क्रू हाताने ढिले केले आणि ते चक्क गिळंकृत केले.

—-

पोलिसांना घाम फुटला

दुपारनंतर महिलांगेची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, त्याने दाराचे खिळे खाल्ल्याची माहिती दिली. पोलिसांनी कोठडी जवळच्या दाराची पाहणी केली असता, त्या दाराचे स्क्रू गायब दिसले. त्यामुळे पोलिसांना दरदरून घाम फुटला. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. पोलीस कस्टडीत असताना महिलांगेचा मृत्यू झाल्यास अनेकांच्या नोकऱ्याच नव्हे तर भविष्य धोक्यात येऊ शकते, हे ध्यानात आल्याने त्याला तातडीने मेयोत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी महिलांगेवर उपचार सुरू केले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकारामुळे लकडगंज पोलिसांचा बीपी चांगलाच वाढला आहे. महिलांगेविरुद्ध पोलीस आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

—-

Web Title: The police job that was eaten before is now eaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.