उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:28 PM2019-01-03T21:28:40+5:302019-01-03T21:33:57+5:30

पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला.

Police keep eye on 16, 377 criminals in Nagpur | उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांवर पोलिसांची नजर

उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांवर पोलिसांची नजर

Next
ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारी घटविण्यात यश : पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमांमुळे वर्षभरात उपराजधानीतील १६, ३७७ गुन्हेगारांपर्यंत पोलीस पोहचले. त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवली जात असल्याने गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले आहेत. सोबतच महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांना आळा घालण्यातही आम्ही यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केला. गुरुवारी त्यांनी या संबंधाने पत्रकारांशी जिमखान्यात संवाद साधला. कुख्यात गुंडांवर कठोर कारवाई करण्यात कसलीही हयगय करण्यात येणार नाही, असे सांगतानाच काही ठिकाणी पोलीस अपयशी ठरले, याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
पोलीस आयुक्तांचा पदभार सांभाळल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेऊन शहरात घडलेल्या २०१७ आणि २०१८ मधील गुन्हेगारीचा तुलनात्मक अहवाल पोलिसांसमोर ठेवला. ते म्हणाले, पोलिसांनी ऑपरेशन क्रिस्प, ऑपरेशन क्रॅकडाऊन आणि ऑपरेशन वाईप आऊट राबविले. त्यात १६, ३७७ गुन्हेगारांची माहिती पोलिसांकडे संकलित झाली. यात काही नवीन तर काही जुन्या गुन्हेगारांचा समावेश आहे. या सर्वांच्या हालचालीवर आम्ही नजर ठेवून आहोत. सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत खुनाचे १३ गुन्हे कमी झाले, बलात्काराचे ८, विनयभंगाचे १०, चेनस्रॅचिंग ४१, लुटमार ८०, खंडणी वसुलीचे ६, घरफोडीचे १३४, दुखापतीचे ३५ आणि इतर असे एकूण ८९८ गंभीर गुन्हे कमी घडले. सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात असल्यामुळे शहरातील ९ टक्के गुन्हे कमी झाले. गेल्या वर्षी ८५८४ गुन्हे घडले. त्यातील ५४३७ गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला असून दोष सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यातही पोलिसांनी यश मिळवल्याचे ते म्हणाले. तडीपार गुंड शहरातच फिरतात आणि गुन्हेही करतात. वर्षाच्या अखेरच्या दिवशी इमामवाड्यातील तडीपार गुंडांना एका निरपराध तरुणाला घरातून खेचून बाहेर काढले आणि त्याची हत्या केली, हा प्रकार पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला असता त्यांनी हा प्रकार खेदजनक असल्याचे सांगून पोलिसांचे ते अपयश असल्याचे कबूल केले.
पत्रकार परिषदेला सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, राहुल माकणीकर, संभाजी कदम, चिन्मय पंडित, हर्ष पोद्दार, विवेक मासाळ, राजतिलक रोशन, निर्मला देवी, श्वेता खेडकर उपस्थित होते.
दामिनी पथक आणि वादग्रस्त पोलीस
महिला-मुलीच्या छेडखानीचे प्रकार रोखण्यासाठी तसेच सडकछाप मजनूंना आवरण्यासाठी पोलिसांनी दामिनी पथकांची निर्मिती केली. ही पथके जबाबदारीची औपचारिकता पूर्ण करताना दिसतात. त्यामुळे महिला-मुलीच्या विनयभंगाचे प्रकार भररस्त्यावर घडत असल्याचे आयुक्तांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी दामिनी पथके अधिक कार्यशिल करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचाही मुद्दा उपस्थित झाला. अशा पोलीस अधिकाऱ्याबाबत ठोस तक्रार आणि पुरावे मिळाल्यास कडक कारवाई करू, असे डॉ. उपाध्याय म्हणाले.
तडीपारांवरील कारवाईबाबत वेगळा विचार
वर्षभरात अनेक गुंडांना तडीपार करण्यात आले तर गुंडांच्या आठ टोळ्यांवर मोक्का लावून अनेक कुख्यात गुंडांना स्थानबद्ध करण्यात आले. मात्र एवढे करूनही तडीपार गुंड शहरात मोकाट फिरताना, गुन्हे करताना दिसतात. त्यामुळे तडीपार गुंडांवर वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्यावर आम्ही विचार करीत आहोत, असे पोलीस आयुक्त म्हणाले.
पावणे तीन कोटींचे अमली पदार्थ जप्त
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तसेच तस्करी करणारांवर कारवाई करीत वर्षभरात २ कोटी ८२ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. वेगवेगळ्या मार्गाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करून अनेक हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले.
वाहतूक समस्या
उपराजधानीत सिमेंट रोड आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतूक सुरळीत राखणे कठीण झाले आहे. अशाही अवस्थेत पोलीस चांगल्या पद्धतीने वाहतूकीची कोंडी टाळून अपघात घडू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचमुळे शहरातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. रॅश ड्रायव्हिंग, हेल्मेट सक्ती आणि ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमांमुळे अपघात कमी होण्यात मदत झाली आहे.

 

 

 

Web Title: Police keep eye on 16, 377 criminals in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.