रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; युवा संघर्ष यात्रेतील गोंधळानंतर दिली ही प्रतिक्रिया
By जितेंद्र ढवळे | Published: December 12, 2023 09:11 PM2023-12-12T21:11:53+5:302023-12-12T21:12:00+5:30
रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक
नागपूर: राज्यातील बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेनंतर मंगळवारी नागपुरात राडा झाला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसात अर्धा तास झालेल्या झटापटीमुळे टेकडी रोडवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बिघडलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
या घटनेनंतर रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत, तरी सामान्यांचे प्रश्न सोडवतील अशी आम्ही अपेक्षा करतोय. आता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, त्या बैठकीनंतर चर्चा करू, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात प्रश्न आहेत. शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही निघालो आहोत. पण, या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही. त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असे रोहित पवार म्हणाले. एखाद्या आमदाराचे कुणी ऐकत नसेल तर सामान्य माणसाचे कोण ऐकणार? हे सरकार भित्रं आहे, अशी टीका त्यांनी केली.
नेमकं काय झालं?
सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीतरी सभास्थळी यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले होते. मात्र, सभा संपल्यानंतरही कुणी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह निवेदन असलेल्या बैलगाडीसह विधानभवनाकडे कूच केला. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यात पोलिस आणि कार्यकर्त्यांत झटापट झाली. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनीही बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या संघर्षात आ. रोहित पवार, आ. संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, सलील देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुजा पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. युवा संघर्ष यात्रेला बळ देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके हे कार्यकर्त्यांसोबत सहभागी झाले होते. पोलिसांशी झालेल्या झटापटीत तेही जखमी झाले.