नागपुरात विदर्भवाद्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज,एक कार्यकर्ता जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:12 PM2018-05-02T17:12:20+5:302018-05-02T17:12:32+5:30
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे ) काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी (१ मे ) काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली. विदभार्वाद्यांच्या या मोर्चात पोलिसांनी बळाचा वापर केला आणि मोचार्ला पांगविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवती, माजी आमदार सरोज काशीकर, अॅड. नंदा पराते, डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
विदर्भवादी संघटना महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळतात. त्याअनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात चौदा विदर्भवादी संघटनानी नागपुरात भव्य मोचा काढला. भर दुपारी ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उन्हात विदर्भवादी रस्त्यावर उतरले आणि विदर्भाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. यशवंत स्टेडीयम येथून दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान मोचार्ला प्रारंभ झाला. विदर्भवादी नेते व माजी आमदार अॅड. वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीचे वरिष्ठ सदस्य व अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, निमंत्रक राम नेवले, प्रबीर चक्रवर्ती, नागपूर जिल्हा अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष अॅड. नंदा पराते, पश्चिम विदर्भ महिला आघाडीच्या रंजना मामर्डे, अॅड. गोविंद भेंडारकर, शहराध्यक्ष राजू नागुलवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. जय विदर्भचे फलक घेतलेले कार्यकर्ते घोषणा देत बँक आॅफ महाराष्ट्र मार्गे झाशी राणी चौक, सीताबर्डी मेन रोड, लोखंडी पूल, टेकडी गणेश ओव्हरब्रीज, जयस्तंभ चौक मार्गे परवाना भवन चौक येथे पोहोचले. यशवंत स्टेडियमवरुन विधानभवनाच्या दिशेने निघालेल्या मोचार्ला पोलिसांनी कस्तूरचंद पार्कजवळ थांबवले. यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्सवरुन विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात रवी वानखेडे हा कार्यकर्ता जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अटकसत्र सुरु केले. ज्येष्ठ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली. सायंकाळच्या सुमारास सर्वांची सुटका करण्यात आली.
मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करू
पोलिसांचा आणि राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो. वेगळा विदर्भ देण्याचे मोदी, गडकरी आणि फडणवीस यांच्यात नाही बळ, आता सर्व सोडून पळ, असे अॅड. वामनराव चटप म्हणाले. एक कार्यकर्ता या आंदोलनात जखमी झालेला आहे. आम्ही मानवाधिकार आयोगाला कळवू. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
पोलिसांनीच बळजबरी केली
मोर्चात जखमी झालेल्या युवकाचे नाव रवी वानखेडे असे होते. आम्ही शांतपणे आंदोलन करीत होतो. पण पोलिसांनीच बळजबरी केली आणि माझ्यावर हल्ला केला, असे रवी वानखेडे यावेळी म्हणाला.
अखेर झेंडा फडकला
विदर्भवादी आंदोलक विधानभवनावर झेंडा फडकवण्यासाठीच रस्त्यावर उतरले होते. पण पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे झेंडा फडकवणे कठीण होवून बसले होते. अखेर काही युवा कार्यकर्त्यांनी एक शक्कल लढवली आणि द्रोण विमानाच्या माध्यमातून विधानभवन परिसरातील एका झाडावर विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला.