नागपुरात एमडी तस्करांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 07:34 AM2021-05-11T07:34:15+5:302021-05-11T07:35:17+5:30
Nagpur News एमडी तस्करीत सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात नागपूर पोलिसांनी सोमवारी मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. एकाच वेळी ३२ गुन्हेगारांच्या घरी धाडी टाकल्या. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांना दोन ठिकाणी यश मिळाले.
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमडी तस्करीत सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात नागपूर पोलिसांनी सोमवारी मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. एकाच वेळी ३२ गुन्हेगारांच्या घरी धाडी टाकल्या. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांना दोन ठिकाणी यश मिळाले. या कारवाईमुळे एमडी तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
उपराजधानी एमडी तस्करीचे मोठे केंद्र आहे. लॉकडाऊनच्या कालावधीतदेखील लाखो रुपयांच्या एमडीची विक्री होत होती. लोकमतने याचा खुलासादेखील केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुन्ह्यांसोबतच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी प्रयत्न करत होते. काही दिवसांअगोदर गुन्हे शाखेत एनडीपीएस सेलची सात पथके तयार करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी सोमवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून अमली पदार्थांविरोधात संयुक्त ऑपरेशन राबविण्याचे निर्देश दिले. शहरात एमडी तस्करीत ३२ गुन्हेगार सहभागी आहेत. मागील अनेक काळापासून हे तस्करी करत होते. पोलीस आयुक्तांनी सर्वांविरोधात एकाच वेळी कारवाई करण्याची सूचना केली. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची ३२ पथके तयार करण्यात आली. १६० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी ३२ गुन्हेगारांच्या घरी धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान हसनबाग निवासी शेख जावेद शेख रहमानच्या घरून एमडी जप्त करण्यात आले. यासोबतच गिट्टीखदानमध्येदेखील एका गुन्हेगाराच्या घरून गांजा जप्त झाला.
एमडीचे सेवन करणाऱ्यांची संख्या शेकडोंमध्ये आहे. पुढील कालावधीत पोलीस एमडी सेवन करणाऱ्यांविरोधातदेखील व्यापक मोहीम राबविणार आहेत. एमडी तस्करांची पाळेमुळे घट्ट असल्याचे कारणदेखील पोलीसच आहेत. अनेक मोठ्या तस्करांचे पोलिसांसोबत विशेष संबंध आहेत. नंदनवन ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांंविरोधात तत्कालीन उपायुक्त निर्मलादेवी यांच्या निर्देशांवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता व तस्करीच्या प्रकरणात अटक झाली होती. आज अटक करण्यात आलेला शेख जावेद हाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या पतनाचे कारण बनला होता. उत्तर नागपुरात राहणारी एक तरुणी मैत्रिणींच्या मदतीने अनेक वर्षांपासून एमडी तस्करी करत आहे. पोलिसांचे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी ती जुळली आहे. त्यामुळेच अनेक प्रकरणांत नाव समोर आल्यानंतरदेखील तिच्यावर कारवाई झालेली नाही. झाशी राणी चौकात मध्यरात्रीनंतर कारमध्ये तिच्याकडून एमडीची डिलिव्हरी दिली जाते.
याचप्रकारे मानकापूरचा एक मोठा एमडी तस्कर काही काळाअगोदर कारागृहातून बाहेर आला आहे. पोलीस आयुक्तांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात कारवाईचा आदेश दिल्यानंतर पोलिसांमध्येदेखील खळबळ उडाली आहे.
तस्करांना मुळापासून उखडून फेकू : पोलीस आयुक्त
अमली पदार्थांच्या तस्करीला मुळापासून उखडून फेकण्यासाठी हे ऑपरेशन राबविण्यात आले. पुढील काही दिवसांत सर्व प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन करणाऱ्यांविरोधातदेखील मोहीम राबविण्यात येईल. शहरातील काही पांढरपेशे लोकदेखील तस्करीत सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. अशा लोकांनादेखील त्यांची जागा दाखविण्यात येईल. ड्रग फ्री सिटीअंतर्गत शहराला नशामुक्त करणे हा पोलिसांचा संकल्प आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोकमतला सांगितले.