दारुविक्रेत्यांवर पोलिसांची नजर
By Admin | Published: January 29, 2015 01:01 AM2015-01-29T01:01:38+5:302015-01-29T01:01:38+5:30
कामठी आणि केळवद पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाड मारून अवैधपणे दारुची वाहतूक करणे, दारुभट्टी चालविण्याप्रकरणी पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८
कामठी / केळवद : कामठी आणि केळवद पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाड मारून अवैधपणे दारुची वाहतूक करणे, दारुभट्टी चालविण्याप्रकरणी पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
कामठी पोलिसांनी आजनी भुयारी मार्गावरून अनिल ऊर्फ मुकेश श्यामराव भोगापाई (२६) याला ताब्यात घेतले. तो एमएच-३१/एटी-८००४ क्रमांकाच्या स्कुटरच्या डिक्कीतून देशी दारुच्या अवैधरीत्या १९२ बॉटल घेऊन जात होता. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी स्कुटरची तपासणी केली असता दारू आढळली. याप्रकरणी सात हजार ६८० रुपये किमतीची दारु आणि स्कुटर असा एकूण १२ हजार ६८० रुपयांचा ऐवज जप्त केला. दुसरी कारवाई आझादनगर येथे करून मोहम्मद शरिफ ऊर्फ राजा मोहम्मद सलिम (२३) याला ताब्यात घेतले. तो अवैधरीत्या घरी दारु विक्री करीत होता. त्याच्याकडून चार हजार ३२० रुपयांची २४ बॉटल देशी - विदेशी दारु जप्त केली.
केळवद पोलिसांनी तिडंगी (पारधीबेडा) येथे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास धाड टाकली. तेथून मोहफुल दारुची भट्टी चालविणारे किशोर पुंडलिक मारवाडी (६०), चंद्रपाल संतोष राजपूत (६०), संदीप दिलीप राजपूत (२४) सर्व रा. तिडंगी पारधीबेडा यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून मोहफुल सडवा, मोहफुलाची दारु, दारुभट्टीचे साहित्य असा एकूण ६३ हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक पारधी, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर भरणे, पोलीस हवालदार जयेंद्र दांडेकर, चंद्रशेखर घडेकर, दिलीप पटले, श्याम पोपळे यांनी पार पाडली. पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)