पाेलीस, मनपा अधिकाऱ्यांनी केली अजनी वृक्षताेडीचा पंचनामा

By निशांत वानखेडे | Published: April 23, 2023 09:06 PM2023-04-23T21:06:38+5:302023-04-23T21:06:44+5:30

विनापरवानगी शेकडाे झाडे कापली : आरएलडीएविरुद्ध तक्रार

police, municipal authorities made a panchnama of tree removal | पाेलीस, मनपा अधिकाऱ्यांनी केली अजनी वृक्षताेडीचा पंचनामा

पाेलीस, मनपा अधिकाऱ्यांनी केली अजनी वृक्षताेडीचा पंचनामा

googlenewsNext

नागपूर : अजनी रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या शेकडाे झाडांच्या कटाईमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये असंताेष पसरला असून वृक्षताेड करणाऱ्या रेल्वे लॅंड डेव्हलपमेंट ऑथाॅरिटी (आरएलडीए) विराेधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि इमामवाडा पाेलिसांनी वृक्षताेड झालेल्या परिसराचा पंचनामा केला.

महापालिकेचे उद्यान निरीक्षक अमाेल चाैरपगार यांचे पथक आणि इमामवाड्याचे पाेलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी रेल्वे स्टेशन परिसराचे निरीक्षण केले. शहरातील स्वच्छ फाउंडेशन या संस्थेने आरएलडीए विराेधात इमामवाडा पाेलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पाेलिसांनी कागदपत्र मागविले असून महापालिकेकडून साेमवारी आरएलडीए कंत्राटदाराविराेधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरएलडीएद्वारे ३०० कोटींहून अधिक खर्च करून अजनी रेल्वे स्थानकाचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येत आहे. स्टेशनचा विस्तार करण्यात येणार असून अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी छोट्या स्टेशनच्या आजूबाजूची जमीन आवश्यक आहे. वृक्ष संवर्धन कायद्यानुसार आरएलडीएने झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी घ्यायला हवी होती. तोडण्यात येणाऱ्या झाडांची संख्या २०० पेक्षा जास्त असल्यास राज्य वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे आणि झाडे ५० वर्षांपेक्षा जास्त जुने असल्यास प्राधिकरणाची परवानगी देखील आवश्यक आहे.

स्वच्छ फाउंडेशनच्या तक्रारीनुसार आरएलडीएने झाडे ताेडण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली नाही. त्याऐवजी त्यांच्या कंत्राटदाराने अनधिकृतपणे चाेरून झाडांची कटाई केली. कंत्राटदाराने ५०० ते ६०० झाडांची कटाई केली असल्याचा दावा संस्थेने तक्रारीत केला आहे. साेमवारपर्यंत उद्यान विभागाच्या पूर्ण पंचनाम्यानंतरच किती झाडे ताेडली याचा आकडा निश्चित हाेवू शकेल. झाडे ताेडण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगत आरएलडीएचा कंत्राटदार आपले अनधिकृत कृत्य लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेप स्वच्छ फाउंडेशनच्या अनसूया छाबरानी यांनी केला आहे. लाेकमतने आरएलडीएच्या अजनी प्रकल्पाच्या प्रमुखांना विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी या प्रकरणात बाेलण्यास नकार दिला.

Web Title: police, municipal authorities made a panchnama of tree removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.