नागपुरात साध्या वेशात उभे राहणार पोलीस; सिग्नल तोडणाऱ्यांवर होईल कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:18 AM2019-07-04T11:18:18+5:302019-07-04T11:18:39+5:30
सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिग्नल बंद असतानादेखिल स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता मध्येच सुसाट वेगाने वाहन दामटणाऱ्या (सिग्नल जम्पिंग) वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.
या पथकातील वाहतूक शाखेचे पोलीस साध्या वेशात शहरातील विविध सिग्नलच्या आजूबाजूला उभे राहणार आहेत. कोणत्याही दिशेने वाहन चालकाने सिग्नल तोडून पळण्याचा प्रयत्न केला तर समोर उभे असलेले हे साध्या वेशातील वाहतूक पोलीस त्याला अडवतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. एवढे करून वाहनचालकांने पोलिसांना चुकविले तर प्रत्येक सिग्नलवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या माध्यमातून वाहनचालकाचा पत्ता शोधून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
सिग्नल जम्पिंगमुळे अनेकदा दोष नसलेल्या वाहनचालकांना किंवा पायी जाणाऱ्यांना अपघात होतो. अपघात घडविणारा पळून जातो किंवा त्यालाही अनेकदा गंभीर दुखापत होते किंवा कुणाचा जीवही जातो. अपघातामुळे संबंधितांच्या कुुटुंबीयांची न भरून निघणारी हानी होते. अनेकांना अपंगत्व येते.
सिग्नल हा काही सेकंदच बंद असतो. तरीदेखिल बेशिस्त वाहनचालक काही क्षणांसाठी स्वत:चा आणि दुसºयाचा जीव धोक्यात घालतात. असे होऊ नये, नागपूर शहर अपघातमुक्त शहर व्हावे आणि प्रत्येकालाच वाहतुकीचे नियम पाळण्याची शिस्त लागावी म्हणून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम आखली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या सिग्नल क्रॅक टीम्स तयार करण्यात आल्या आहेत.
आज पहिल्याच दिवशी या पथकांनी सिग्नल तोडणाऱ्या १६२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. सिग्नल जम्पिंगचे प्रमाणे शून्य करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे वाहतूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांची मदत
पोलिसांना चकमा देऊन पळून गेलेल्यांच्या घरी जाऊन संबंधित वाहनचालकाविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. कुणी वाहनचालक वारंवार हा गुन्हा करत असेल तर त्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (आरटीओ) पाठविला जाणार आहे.