मकोकातील आरोपीकडून पोलीस अधिकाऱ्याने खरेदी केला फ्लॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:59+5:302021-03-16T04:09:59+5:30
नागपूर : शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने मकोकातील फरार गुंडाकडून फ्लॅट खरेदी केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. फ्लॅटची खरेदी आणि ...
नागपूर : शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने मकोकातील फरार गुंडाकडून फ्लॅट खरेदी केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. फ्लॅटची खरेदी आणि महागड्या भेटवस्तूच्या बदल्यात हा अधिकारी त्या गुंडाला फरार होण्यात आणि मकोका प्रकरणातून सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात गुंतला होता, अशीही माहिती आहे. लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेचे शारीरिक शोषण व फसवणूक करणाऱ्या अरविंद भोले प्रकरणातील तपासात या अधिकाऱ्यासंदर्भातील ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
भोलेने संबंधित पीडित महिलेला गिट्टीखदानमधील एका फ्लॅटमध्ये ठेवले होते. हा फ्लॅट एका शहर पोलीस अधिकाऱ्याचा आहे. भोले फरार होताच या अधिकाऱ्याने महिलेला मारहाण करून व धमकी देऊन फ्लॅटबाहेर काढले. सूत्रांच्या माहितीनुसार, हा फ्लॅट रोशन शेख प्रकरणातील मकोकाअंतर्गत फरार झालेल्या आरोपीचा आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेक वर्षांपासून त्याची या पोलीस अधिकाऱ्यासोबत मैत्री आहे. या अधिकाऱ्याने तीन वर्षापूर्वी कमी किमतीत हा फ्लॅट खरेदी केला होता. ऐशोआरामासाठी शौकिनांना तो भाड्याने द्यायचा. भोलेबद्दल माहिती असूनही त्याने हा फ्लॅट त्याला भाड्याने दिला होता. रोशन शेख प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर व पुढे मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यावर त्याचे नातेवाईक पुन्हा या अधिकाऱ्याला शरण आले होते. त्या वेळी मदत करण्याच्या नावाखाली रोशनच्या कुटुंबीयांकडून एक लाख रुपये किमतीचा आयफोन तसेच अनेक महागड्या वस्तू भेटीदाखल घेतल्या होत्या. मकोकाची कारवाई टाळण्यासाठी त्याने भरपूर प्रयत्न केले, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे त्याचे काही चालू शकले नाही.
कधी एके काळी हा अधिकारी अंबाझरी ठाण्यात शिपाई होता. पीएसआय म्हणून निवड झाल्यावर
त्याची नियुक्ती पुन्हा याच ठाण्यात करण्यात आली. तिथे रस्ता अपघातामध्ये एका बिल्डरच्या पत्नीच्या कारमुळे अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. तिला वाचविण्यासाठी या अधिकाऱ्याने लाखो रुपये उकळले. ‘डमी’ आरोपीला अटक केली. मृताच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यावर त्याचा हा कारनामा पुढे आला. या प्रकरणात त्याची वेतनवृद्धी थांबवून बजाजनगर ठाण्यात बदली करण्यात आली. तिथेही त्याचे वसुलीचे अनेक किस्से घडले. येथेही पुन्हा वेतनवृद्धी रद्द करून शिक्षा म्हणून मुख्यालयात पाठविण्यात आले. मात्र संधान साधून त्याने नंदनवन ठाण्यात बदली करून घेतली. तिथेही वसुलीचे प्रकार सुरू केल्याचे लक्षात आल्यावर तिसऱ्यांदा वेतनवृद्धी रद्द करून त्याला विशेष शाखेत पाठविण्यात आले....
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या परिचिताकडूनच वसुली
बजाजनगर ठाण्यात कार्यरत असताना एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या परिचिताकडूनच वसुली केली होती. या व्यक्तीच्या फ्लॅटवर कुख्यात शेखूने कब्जा केला होता. त्यांनी बजाजनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कारवाई होताच शेखूने माघार घेऊन फ्लॅट रिकामा करून दिला. मात्र या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीकडून रक्कम हडपली. हा प्रकार कळताच महिला पोलीस अधिकारी ठाण्यात पोहचली होती. कॉलर पकडून या अधिकाऱ्याचा क्लास घेतला होता. नंतर त्याने रक्कम परत केली. एवढे होऊनही त्याच्यात सुधारणा झाली नव्हती.