विदर्भात नियुक्तीबाबत पोलीस अधिकारी उदासीन
By admin | Published: January 23, 2017 01:50 AM2017-01-23T01:50:48+5:302017-01-23T01:50:48+5:30
राज्यातील पोलीस अधिकारी नागपूर किंवा विदर्भातील नियुक्तीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत.
बदलीच्या १५ दिवसानंतरही जागा रिक्तच : अतिरिक्त प्रभारींच्या भरवशावर काम सुरू
जगदीश जोशी नागपूर
राज्यातील पोलीस अधिकारी नागपूर किंवा विदर्भातील नियुक्तीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. ते येथे येणे पसंतच करीत नाहीत. सरकारचे धोरण आणि इच्छा याचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर होत नाही. नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदल्या याचे ताजे उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच हे चित्र असेल तर दुसऱ्या शहरांमध्ये काय सुरू असेल हे दिसून येते.
गृह विभागाने ५ जानेवारी रोजी सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची राज्य अन्वेषण विभाग (एसआयडी) मुंबई येथे बदली केली होती. त्यांच्या जागेवर कुणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. महापालिका निवडणुका जवळ असल्याने गृह विभागाने ९ जानेवारीला रस्तोगी यांच्या जागेवर नक्षलवादीविरोधी अभियानाचे महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांची बदली केली होती. बोडखे यांच्या जागेवर शैलेश शेलार यांना पाठविण्यात आले. या आदेशानंतर रस्तोगी यांना शहर पोलिसातून मुक्त करण्यात आले. त्यांनी तातडीने मुंबईत पदभारही स्वीकारला. परंतु बदली आदेश होऊन १५ दिवस लोटल्यानंतरही सहपोलीस आयुक्तांचे पद मात्र रिक्त आहे. त्यांच्या जागेवर पाठविण्यात आलेले शिवाजी बोडखे शहरातच आहे. परंतु त्यांच्या ठिकाणी पाठविण्यात आलेल्या शेलारे यांनी अजुनही पदभार न स्वीकारल्याने बोडखे त्यांच्या ठिकाणी कायम आहेत. नक्षलविरोधी अभियानची जबाबदारी महत्त्वाची आहे.
निवडणुकांदरम्यान नक्षली कारवाया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बोडखे हे त्यांच्या जागेवर कुणी आले तरच संयुक्त पोलीस आयुक्तांचे पद स्वीकारू शकतात. आता सर्व काही शेलारे यांच्यावर अवलंबून आहे.
९ जानेवारी रोजी लोहमार्ग पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचीही ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. बलकवडे यांच्या जागेवर साहेबराव पाटील यांना पाठविण्यात आले. बलकवडे यांनी १० जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस अधीक्षकाचा पदभार स्वीकारला. परंतु साहेबराव पाटील मात्र अजूनही आलेले नाही.
५ जानेवारीला गृह विभागाने अप्पर आयुक्त प्रतापसिंह पाटणकर यांना महानिरीक्षक म्हणून पदोन्नती देत विशेष महानिरीक्षक बनविले होते. त्यांच्या जागेवर कुणालाही नियुक्ती देण्यात आली नाही. त्यांनी सुद्धा २१ डिसेंबर २०१६ रोजी म्हणजेच बदलीच्या केवळ १५ दिवसांपूर्वीच अप्पर आयुक्ताचे पद स्वीकारले होते.
पाटणकर यांनी सुद्धा १० जानेवरी रोजी कार्यमुक्त होऊन विशेष महानिरीक्षकाची जबाबदारी स्वीकारली. सध्या शहर पोलिसात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाच जागा रिक्त आहेत. यात संयुक्त आयुक्त, तीन अप्पर आयुक्त आणि एक उपायुक्ताचे पद आहे.(प्रतिनिधी)
निवडणुकीचीही नाही चिंता
सहपोलीस आयुक्त हे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख असतात. मनपा निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांसाठी निवडणुका या प्रतिष्ठेचा असतात. गुन्हेगारही निवडणकांमध्ये सक्रिय होतात. आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे आता बदली करता येणार नाही. अशा परिस्थितीत पोलिसांची मुख्य भूमिका आहे. शहरातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पद रिक्त असणे हे चिंतेचे कारण आहे. सहपोलीस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार रंजनकुमार शर्मा यांच्याकडे आहे. डीसीपी शर्मा स्वत: दीड वर्षांपासून गुन्हे शाखेच्या आयुक्ताचा अतिरिक्त कारभार पाहत आहेत.