मुख्याध्यापकाला मारहाण आरोपीला पोलिसांचे अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:05 AM2017-09-19T00:05:41+5:302017-09-19T00:06:01+5:30
कर्तव्यात कसूर करणाºया शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस दिल्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या मुलाने शाळेच्या आवारात मुख्याध्यापकाला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्तव्यात कसूर करणाºया शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस दिल्यामुळे संतप्त झालेल्या तिच्या मुलाने शाळेच्या आवारात मुख्याध्यापकाला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. भांडेवाडीतील जयविजय प्राथमिक शाळेत सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. कळस म्हणजे, कर्तव्यावरील मुख्याध्यापकाला मारहाण करणाºया आरोपीला अभय देत कळमना पोलिसांनी या प्रकरणाला अदखलपात्र (एनसी) ठरवले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजय बोंदरे असे मारहाण झालेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे. ते जयविजय शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी पदवीधर शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेची निवडणूकही लढवली आहे. बोंदरे यांनी कळमना ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शाळेतील एका शिक्षिकेच्या विरोधात त्यांच्याकडे तक्रारी होत्या. मुलांना त्या व्यवस्थित शिकवत नसल्याचीही ओरड होती. त्या संबंधाने एक दोनदा समज दिल्यानंतरही तक्रारी कमी न झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी बोंदरे यांनी त्या शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस दिली. त्यातून शाळेत वादही झाला. त्यानंतर नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास मुख्याध्यापक बोंदरे आपल्या कर्तव्यावर असताना आरोपी राहुल मस्के (पारडी) शाळेत आला. त्याने मुख्याध्यापक बोंदरे यांच्यासोबत वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे शाळेत एकच गोंधळ निर्माण झाला. शाळेतील कर्मचाºयांनी धाव घेऊन आरोपी म्हस्केच्या तावडीतून बोंदरे यांना सोडवले. त्यानंतर आरोपी धमकी देऊन शाळेतून निघून गेला. बोंदरे यांनी या घटनेची तक्रार कळमना पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी त्याची नोंद अदखलपात्र (एनसी) अशी घेऊन बोंदरेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
शाळेतील वातावरण संतप्त
मुख्याध्यापकाला बाहेरचा व्यक्ती येऊन मारहाण करतो आणि पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्याला अभय देत असल्याचे लक्षात आल्यामुळे शाळेतील वातावरण संतप्त झाले. शिक्षक, कर्मचाºयांनी या घटनेचा निषेध नोंदवला. आपला काही दोष नसताना आरोपीने आपल्याला मारहाण करून अपमानीत केले. त्यामुळे आपल्याला जबर मानसिक धक्का बसल्याचे मुख्याध्यापक बोंदरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या मारहाणीमागे षडयंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.