उपराजधानीतील पन्नाशी ओलांडलेले पोलीस कार्यालयातच काम करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:10 AM2020-05-19T11:10:08+5:302020-05-19T11:10:32+5:30
५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस दलातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.
त्यामुळे सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्त अथवा इतर बाहेर ठिकाणचे कर्तव्य बजावणार नाहीत. तर ते पोलीस ठाणे अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राहूनच कर्तव्यपूर्ती करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग अंधाधुंद गोळीबारासारखा धोकादायक आहे. कुणाला कशा पद्धतीने प्रादुर्भाव होईल याचा कसलीही नेम नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला धोका जास्त असतो. त्यात ज्यांना उच्च रक्तदाब. मधुमेहासारखी व्याधी आहे, अशांसाठी कोरोना फारच धोकादायक असतो, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. नागपूर पोलीस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे शनिवारी उघडकीस आले आणि अवघ्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे खबरदारी नव्हे तर अतिखबरदारीचे अनेक उपाय हाती घेण्यात आले आहेत. शहरातील जे परिसर (रेड झोन) सील करण्यात आले, अशा ठिकाणच्या पोलिसांना सुरक्षा किट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अन्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय शहर पोलीस दलात असलेल्या ५० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फिल्डवर पाठवायचे नाही. त्यांना कोणत्याही बंदोबस्ताची ड्यूटी देऊ नका, पोलिस ठाण्यात अथवा कार्यालयातच बसवून त्यांच्याकडून काम करून घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलातील सुमारे एक हजार पोलिस कर्मचारी ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना रक्तदाब, मधुमेह आणि दुसरी कोणती व्याधी आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त आता कार्यालयीन कामकाजच देण्यात आले आहे.
लष्करी दलाची गरज नाही
सरकारने मागणी केल्यानुसार महाराष्ट्राला केंद्राकडून लष्करी जवानांच्या १० कंपन्या मिळाल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ते जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याकडे विचारणा केली असता, नागपुरात पोलिसांचे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे येथे लष्करी दलाच्या कंपनीची फारशी गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.