पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण
By admin | Published: September 16, 2016 03:17 AM2016-09-16T03:17:16+5:302016-09-16T03:17:16+5:30
चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण
आरोपी ठाण्यातून गायब : चार दिवसांतील तिसरी घटना
नागपूर : चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी झांशी राणी चौकात घडली. गुन्हा दाखल करण्याची माहिती होताच आरोपी युवक सीताबर्डी पोलीस ठाण्यातून गायब झाला. यामुळे पोलिसांत खळबळ उडाली.
तुषार वर्मा असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार तुषारने सकाळी ६.३५ वाजता झांशी राणी चौकातील पेट्रोल पंपाच्या ‘कॉर्नर’वर आपली कार पार्क केली होती. झांशी राणी चौकात सकाळच्या वेळी आॅटोचालक आणि अवैध प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होत असते. यासंबंधात तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. घटनेच्या वेळी एपीआय अमोल चव्हाण सहकाऱ्यांसह चौकातील वाहनांना बाजूला करीत होते. शिपाई ओंकार आणि नीलेशने तुषारला सुद्धा त्याचे वाहन (कार) हटविण्यास सांगितले. परंतु तुषारने नकार देत तो पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. पोलीस कर्मचारी त्याचे चालान करून लागले असता तो असभ्य वागणुकीवर उतरला. दरम्यान अमोल नावाचा शिपाई या घटनेची मोबाईल रेकॉर्डिंग करीत होता. ते पाहून तुषारला आणखी राग आला. तो मोबाईल हिसकवण्याच्या प्रयत्नात अमोलला धक्का-बुक्की करू लागला. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सूचनेवर सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस तुषारला ठाण्यात घेऊन गेले.
एपीआय चव्हाण आणि त्यांचे सहकारी सुद्धा ठाण्यात पोहोचले. घटनेची माहिती होताच तुषारचे मित्रही ठाण्यात पोहोचले. यामुळे ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तुषार मित्रांशी बोलत होता. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तो गायब झाला. तुषार गायब झाल्याचे माहिती होताच ठाण्यात खळबळ उडाली. तो गायब होईल याची पोलिसांना कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच फजिती झाली. पोलिसांवर दबाव वाढल्याने सायंकाळी तुषार पोलिसांच्या हाती लागला. सीताबर्डी पोलिसांनी तुषारच्या विरुद्ध पोलिसांना मारहाण व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. मागील चार दिवसात पोलिसांना मारहाण करण्याची ही तिसरी घटना आहे. सोमवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याचे एपीआय अरविंद पवार यांच्यावर रमण असोफा आणि त्याचा भाऊ रजन असोफा याने हल्ला केला होता.
डिप्टी सिग्नल निवासी असोफा बंधू त्यांचे तिसरे बंधू ऋषभला चोरीच्या संशयात ठाण्यात आणले असल्याने दुखावले होते. ऋषभचा शेजारी राजकुमार कुंगवानी यांनी आपल्या तक्रारीमध्ये ऋषभवर चोरीचा संशय घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी ऋषभला ठाण्यात आणले होते.(प्रतिनिधी)
...तर पोलिसांनी काय करावे?
४सकाळी ६ ते १० या वेळात झांशी राणी चौकात वाहतूक पोलिसांची विशेषत्वाने नेमणूक करून आॅटो व अवैध प्रवासी वाहतूक हटविली जाते. पोलिसांच्या या कारवाईला मदत करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईला सहकार्य करण्याऐवजी काही लोक त्यात खोट काढू लागतात. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पदभार स्वीकारताच शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी एका विशेष चमूच्या माध्यमातून आढावा घेत सुधारण्यासाठी पाऊल उचलले आहे. या अंतर्गत झांशी राणी चौकात सकाळी ६ वाजेपासून पोलीस तैनात केले जात आहे. तेव्हा नागरिकांकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अगोदरच वातावरण तणावपूर्ण आहे.