पोलिसांनी उलथवले नागपुरातील गँगस्टरचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:17 AM2019-10-30T00:17:52+5:302019-10-30T00:42:13+5:30
५० किलो चांदी लावून असलेल्या आलिशान खुर्चीवर बसून गुन्हेगारांचा दरबार भरविणाऱ्या गँगस्टर संतोष आंबेकरवर कायद्याचा चाबूक ओढून पोलिसांनी त्याला पुरते हतबल केले आहे. नागपूर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची राज्य पोलीस दलात चर्चा अन् प्रशंसा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५० किलो चांदी लावून असलेल्या आलिशान खुर्चीवर बसून गुन्हेगारांचा दरबार भरविणाऱ्या गँगस्टर संतोष आंबेकरवर कायद्याचा चाबूक ओढून पोलिसांनी त्याला पुरते हतबल केले आहे. त्याच्या घरातील ऐशोरामाच्या चीजवस्तू जप्त करून पोलिसांनी त्याचे साम्राज्य उलथवले आहे. परिणामी नागपूर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची राज्य पोलीस दलात चर्चा अन् प्रशंसा होत आहे.
दहा वर्षांपूर्वी मुंबई पोलीस दलाने अंडरवर्ल्डवर हात घालून अनेकांचे एन्काऊंटर केले. मुंबईत स्फोट घडवून दाऊद, छोटा शकील पळून गेले तर उरलेल्या अरुण गवळी, छोटा राजन, भाई ठाकूर, पुजारीसह अनेकांना पोलिसांनी सळो की पळो करून सोडले. अंडरवर्ल्डमधील सर्वच्या सर्वच भाईंच्या टोळ्यांचा अशाप्रकारे पोलिसांनी सफाया केल्याने मुंबईतील फिल्म प्रोड्यूसर, बिल्डर, मोठमोठे उद्योजक, व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. कारण मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वाधिक त्रास फिल्म इंडस्ट्री, बिल्डर, उद्योजक, व्यापाºयांना होता. अंडरवर्ल्डमधील वेगवेगळ्या भाईंच्या टोळीतील गुंड प्रारंभी त्यांना पेट्या (लाखों) आणि नंतर खोक्यांची (करोडो) खंडणी मागत होते. अनेक टोळ्यांच्या म्होरक्यांमागे एखाद दुसरा नेता उभा राहत असल्याने पोलिसही कचरायचे. मात्र, दिवंगत गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई अंडरवर्ल्डवर पोलिसांनी तुटून पडावे तसा कायद्याचा बडगा उगारला. त्यामुळे अंडरवर्ल्डची दाणादाण झाली. अनेकांचे एन्काऊंटर झाले तर काही गुंड पळून गेले, काही गुंड भूमिगत झाले. सध्या नागपूर पोलिसांनी नागपूर-विदर्भाचा डॉन म्हणून कुख्यात असलेल्या संतोष आंबेकरवर असाच कायद्याचा बडगा उगारला आहे.
उपराजधानीत गेल्या दोन दशकांपासून आंबेकरची प्रचंड दहशत आहे. आंबेकरने त्याच्या विरोधात गेलेल्या बाल्या गावंडे सारख्या गुंडांची हत्या करवून, काहींचे अपहरण करून नागपूर-विदर्भाच्या गुन्हेगारीत प्रचंड दबदबा निर्माण केला होता. कोणताही मोठा गुन्हा घडला की आंबेकरचे नाव त्या गुन्ह्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडले जायचे. त्यामुळे त्याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्याचा पुरेपुर फायदा घेत आंबेकर खुलेआम खंडणी उकळत होता. तो कुठेही जाऊन हस्तक्षेप करायचा अन् मांडवली घडवून आणायचा. त्याने अनेकांच्या मालमत्ता बळकावल्या. त्यात पाच-पंचेवीस लाख रुपयेच मिळत असल्याने त्याने कोट्यवधींचे हात मारण्यासाठी फसवणुकीचा फंडा अवलंबला. नागपूर, मुंबई, गुजरातसह ठिकठिकाणी त्याने दलाल पेरले. त्यांच्या माध्यमातून तो मोठमोठे उद्योजक व्यावसायिक यांना मोक्याच्या जागेची बनावट कागदपत्रे दाखवून ती जागा आपलीच आहे, असे सांगून फसवू लागला. जागेचा सौदा करून त्यांच्याकडून दोन-चार, पाच-सात कोटी रुपये घ्यायचे. करारनामा केल्यानंतर त्यांना नागपुरातील आपल्या आलिशान निवासस्थानी बोलवायचे. येथे महागडी आलिशान वाहने. स्वत:च्या आजूबाजूला बाऊन्सर, मोठमोठे जबड्यांचे श्वान असा सिनेमात दाखवला जाणारा तामझाम दाखवायचा. त्याच्या घरी तो गुंडांचा दरबार भरवायचा आणि तेथे आपसी हेवेदावे, वादग्रस्त सौदे सेटल करून द्यायचा. हे सर्व तो ५० किलो चांदी लावून असलेल्या आलिशान खुर्चीवर बसून ‘सुलतान’ च्या थाटात करीत होता आणि मुद्दामहून तो हे प्रकार त्याने अॅडव्हॉन्सच्या नावाखाली ज्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले आहे, अशा बाहेरच्या व्यक्तीसमोर करीत होता. ते केल्यानंतर संबंधित व्यापारी, उद्योजकाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पुन्हा खंडणीही मागत होता. त्याच्यावर पोलीस अधूनमधून कारवाई करायचे, मात्र ती कारवाई केवळ फार्स असायची, परिणामी त्याची दहशत आणि साम्राज्य वाढतच होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सहा महिन्यांपूर्वी नागपुरातील गुन्हेगारीचा सफाया करण्याचा अॅक्शन प्लान तयार केला. त्यानुसार, संतोषसह उपराजधानीतील टॉप टेन गुन्हेगारांच्या टोळळ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या.
ऑपरेशन सिटी क्राईम
डॉ. उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाच्या क्राईम ब्रॅन्चचे (गुन्हे शाखा) ऑपरेशन हाती घेतले. शाखेत कोणते अधिकारी नेमायचे, त्याचा सूक्ष्म अभ्यास करून डॉ. उपाध्याय यांनी सहा महिन्यांपूर्वी नीलेश भरणे यांना गुन्हे शाखेचे उपायुक्त नेमले तर, त्यांची पदोन्नती झाल्यानंतर गजानन राजमाने यांची येथे नियुक्ती केली.
भरणे आणि राजमाने यांनी डॉ. उपाध्याय यांच्या देखरेखीत ऑपरेशन ‘सिटी क्राईम’ सुरू केले. या दोन्ही अधिकाºयांची विशेषता अशी आहे की ते कागदी घोडे नाचविण्याऐवजी गुन्हेगाराला नाचविण्यावर विश्वास ठेवतात. बाजीराव चालविण्यातही त्यांच्यात साम्य असून, गुन्हेगारीचे डाग स्वच्छ करण्यासाठी त्यांची ‘धुण्याची’ शैलीही जोरदार आहे. कुख्यात गुन्हेगाराची चौकशी ते त्याला आणि स्वत:ला दम येईपर्यंत करतात. त्यांची ही ‘बेदम-बाजीराव’ची शैली नागपूरच्या गुन्हेगारी वर्तुळात कमालीची दहशत निर्माण करणारी ठरली आहे.
ठीक से जानना है तो गुगल पे जाओ !
आधी दहशत पसरवणाऱ्या संतोषने नंतर या दहशतीतूनच साम्राज्य निर्माण केले आहे. ज्याला फसविले किंवा ज्याच्याकडून रक्कम हडपली, त्याने पोलिसांत जाण्याची भाषा वापरल्यास संतोष किंवा त्याचे गुंड त्या (पीडित) व्यक्तीला भाई को ठिकसे पहचानते नही क्या, असे विचारत त्याला संतोष आंबेकर कोण है... ये जानने के लिए, गुगल, यू ट्युबपर जाओ, असे सांगायचे. मात्र, याच आंबेकरला पोलिसांनी आता असे काही घेरले आहे की त्याच्यावर अवघ्या दोन आठवड्यात चार गुन्हे दाखल झाले. पाचवा बडोद्याच्या कोट्यवधींच्या जमिनीचा गुन्हा विचाराधीन आहे. संतोषचे गुन्हेगारी साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कायद्याची धार अधिक धारदार केली आहे. त्याचा कोणताही कारखाना नाही, व्यवसाय नाही, उद्योग नाही, गुन्हे आणि गुन्हेगारीलाच त्याने आपला व्यवसाय बनवून जमा केलेल्या आलिशान चिजवस्तू जप्त केल्या. त्याचे आसनही उलथवले आहे. संतोषवरील कारवाईने गळ्यात आणि हातात सोन्याच्या साखळ्या घालून फिरणारे अनेक भाई आता दिसेनासे झाले आहेत. अनेकांनी आपापली मालमत्ता लपविण्यासाठी धावपळ चालविली आहे. त्याचमुळे नागपूर पोलिसांची ही कारवाई राज्य पोलीस दलात चर्चा तसेच प्रशंसेचा विषय ठरली आहे.