फडणवीसांच्या निवासस्थानासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:15+5:302021-03-23T04:08:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीच्या कथित टार्गेटच्या आरोपामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीच्या कथित टार्गेटच्या आरोपामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्थानिक निवास्थानासमोर पोलिसांनी मोठी सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वादग्रस्त एपीआय सचिन वाझे याला १०० कोटी रुपये वसुलीचे महिन्याला टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आयपीएस अधिकारी परमबिर सिंग यांनी लावला. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. रविवारी राज्यभरात या संबंधाने भाजपाने नारे निदर्शनेही केली. तर नागपुरात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या बंगल्याकडे धाव घेतली होती. या वेळेपासून गृहमंत्री देशमुख यांच्या बंगल्यावरच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही नागपुरात प्रत्युत्तर देत तसेच आंदोलन केले आहे. निर्माण झालेली एकूणच राजकीय परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. त्यांच्या निवासस्थानासमोरच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले असून सशस्त्र जवानही तैनात करण्यात आले आहेत. त्रिकोणी पार्क जवळ शीघ्र कृती दलाचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ही सुरक्षा व्यवस्था उभारल्याची माहिती सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस यांनी लोकमतला दिली.