लग्नाच्या दोन दिवसांपूर्वीच पोलीस शिपाई बेपत्ता
By Admin | Published: March 24, 2017 02:58 AM2017-03-24T02:58:31+5:302017-03-24T02:58:31+5:30
लग्न दोन दिवसांवर असताना अचानकपणे वर मुलगा बुधवारी (दि. २२) बेपत्ता झाला. त्यानंतर त्याची मोटरसायकल हिंगणा पोलीस ठाण्याच्या
हिंगणा : लग्न दोन दिवसांवर असताना अचानकपणे वर मुलगा बुधवारी (दि. २२) बेपत्ता झाला. त्यानंतर त्याची मोटरसायकल हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहगाव (झिल्पी) तलावानजीक आढळून आली. मोटरसायकलशेजारीच त्याच्या चपलासुद्धा होत्या. त्याचे लग्न उद्या (दि. २४) असून त्याच्या अचानकपणे बेपत्ता होण्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. विशेष म्हणजे, लग्न होणारा हा वर मुलगा पोलीस शिपाई आहे.
राजेश रामदास सायरे (२९, रा. नवनीतनगर, वाडी) असे बेपत्ता झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो काटोल पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याचे लग्न शुक्रवारी (दि. २४) आहे. अशात बुधवारी दुपारच्या सुमारास १० मिनिटात येतो, असे सांगून तो एमएच-४०/एच-९६३२ क्रमांकाच्या मोटरसायकलने घराबाहेर पडला. मात्र सायंकाळ होऊनही तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईल बंद असल्याने संपर्क झाला नाही. बरीच शोधाशोध घेऊनही तो आढळून आला नसल्याने अखेर याबाबत वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. हिंगणा पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) दिवसभर शोधमोहीम तीव्र केली.
ठाणेदार हेमंत खराबे, सहायक पोलीस निरीक्षक निस्वादे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोताखोर आणि अग्निशमन दलाला पाचारण करून तलाव आणि परिसरात शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. (प्रतिनिधी)