गोकुळपेठेतील कॅफे विला-५५ वर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 12:11 PM2021-11-29T12:11:12+5:302021-11-29T12:12:35+5:30
प्रतिबंध असूनही सीताबर्डी, अंबाझरीसह काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्यापही बिनबोभाट हुक्का पार्लर सुरू आहेत. ओळखीच्या पोलिसांच्या माध्यमातून सेटलमेंट करून महिन्याला हजारोंची देण देऊन हा गोरखधंदा चालविला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पहाटेपर्यंत युवक-युवतींच्या उड्या पडत असलेल्या गोकुळपेठेतील कॅफे विला - ५५ नामक हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री छापा घातला. या छाप्यात पोलिसांनी हुक्का पॉट तसेच दारू आणि बिअरच्या बाटल्याही जप्त केल्या.
कॅफे विला - ५५ मध्ये हुक्का पार्लर चालविले जाते आणि येथे हुक्क्यासोबतच अवैध दारू आणि बिअरही उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास उपनिरीक्षक कुणाल धुरट, शिपाई आबा मुडे, हवालदार प्रमोद अरखेल, महेश बावणे, नायक जयंता नंदेकर, अनिस शेख, अतिब शेख आणि सुमेर सिंग यांच्या पथकाने गोकुळपेठेतील कॅफे विला - ५५ मध्ये छापा घातला.
येथे संचालक रोहित विनोद तुरकेल आणि त्याचे चार साथीदार ग्राहकांना हुक्का, दारू, बिअर उपलब्ध करून देताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हुक्का पॉट, बडवायझर बिअर, ओल्ड मंक रम जप्त केली. आरोपी तुरकेल आणि साथीदारांविरुद्ध कोप्टा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
इकडे कारवाई, तिकडे शटर डाऊन
प्रतिबंध असूनही सीताबर्डी, अंबाझरीसह काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्यापही बिनबोभाट हुक्का पार्लर सुरू आहेत. ओळखीच्या पोलिसांच्या माध्यमातून सेटलमेंट करून महिन्याला हजारोंची देण देऊन हा गोरखधंदा चालविला जातो. वेळोवेळी छापे पडत असल्याने राज्य सरकारने हुक्का प्रतिबंधित केला असला तरी नागपुरात मात्र तो सुरूच असल्याचे उघड झाले आहे.