तुली इम्पेरियलमधील डर्टी पार्टीवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:30+5:302021-01-03T04:09:30+5:30

नागपूर - पोलीस आणि शासनाचे मनाई आदेश धुडकावून थर्टी फर्स्टच्या नावाखाली डर्टी पार्टी करणाऱ्या तुली इम्पेरियल या तारांकित हॉटेलमध्ये ...

Police raid a dirty party in Tuli Imperial | तुली इम्पेरियलमधील डर्टी पार्टीवर पोलिसांचा छापा

तुली इम्पेरियलमधील डर्टी पार्टीवर पोलिसांचा छापा

Next

नागपूर - पोलीस आणि शासनाचे मनाई आदेश धुडकावून थर्टी फर्स्टच्या नावाखाली डर्टी पार्टी करणाऱ्या तुली इम्पेरियल या तारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे छापा घातला. यावेळी हॉटेलच्या छतावर पार्टीच्या नावाने धांगडधिंगा करताना १९ तरुणी आणि ४८ तरुण टून्न अवस्थेत पोलिसांना आढळले. या सर्वांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्यावर तसेच हॉटेल मालक मोहब्बतसिंग तुली, बछिंदरसिंग तुली आणि व्यवस्थापक संजय मुकंदराव पेंडसे यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, पब, लाऊंज अथवा कोणत्याही ठिकाणी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजन रात्री ११ नंतर करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्याला न जुमानता तुली इम्पेरियलच्या व्यवस्थापनाने थर्टी फर्स्टची ३०० ते ४००जणांची पार्टी आयोजित केली. मध्यरात्र उलटूनही ही पार्टी सुरूच आहे. तसेच पार्टीत महागडे विदेशी मद्य, बंदी असूनही हुक्का दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, मोठा ताफा घेऊन राजमाने शुक्रवारी पहाटे २.३० च्या सुमारास हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये धडकले. दुसऱ्या माळ्यावर त्यावेळी नशेत टून्न असलेल्या तोकड्या कपड्यातील तरुणी तरुणांसोबत डान्सच्या नावाखाली ओरडत, किंचाळत धांगडधिंगा घालत असल्याचे आढळले. दारूच्या अस्ताव्यस्त पडलेल्या बाटल्या आणि हुक्क्याच्या धुराने तेथील वातावरण पुरते नशिली झाले होते. पोलीस आल्याचे लक्षात येताच अनेकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. काहीजण वेगवेगळ्या रूममध्ये लपले, तर काहींनी खाली धाव घेतली. पोलिसांनी ६७ जणांना ताब्यात घेतले. तेथून दोन लाखांचे मद्य तसेच हुक्क्याचे साहित्य आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले.

---

अनेकांना रूममध्ये लपविले ?

पार्टीत ३०० ते ४०० जण सहभागी असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. प्रत्यक्षात केवळ ६७ जणच हाती लागल्याने पोलिसांनी डान्सिंग फ्लोअरचे सीसीटीव्ही तपासले असता त्यात ३०० पेक्षा जास्त तरुण, तरुणी झिंगाट होऊन आरडाओरड करताना आढळले. त्यामुळे पोलीस खाली आल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने पार्टीतील अन्य झिंगाट झालेल्या तरुण, तरुणींना बाजूच्या रूममध्ये लपविल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. या संबंधाने विचारणा केली असता हॉटेल व्यवस्थापकाने या मंडळींनी येथे मुक्कामासाठी रूम बुक केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ६७ जणांना ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली. ही मंडळी बड्या घरची असल्याने पहाटेपर्यंत त्यांचे पालक आणि मित्र हॉटेल, मेडिकलच्या चकरा मारत होते.

---

व्यवस्थापक गजाआड, मालक फरार

बंदी असताना देखील या बेकायदेशीर पार्टीचे आयोजन केल्याच्या आरोपाखाली सीताबर्डी ठाण्यात दारूबंदी कायदा, प्रतिबंधित हुक्क्यासाठी कोप्टा कायदा तसेच कोरोना संसर्गाचा धोका निर्माण केल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि साथ रोग कायद्यानुसार पोलिसांनी आरोपी हॉटेलमालक मोहब्बतसिंग तुली, कुक्कू ऊर्फ बछिंदरसिंग तुली आणि हॉटेलचा सहायक व्यवस्थापक संजय पेंडसे तसेच उपरोक्त ६७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ६७ जणांना सूचनापत्र देऊन सोडून देण्यात आले, तर संजय पेंडसेला अटक करण्यात आली. हॉटेल मालक तुली फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक त्यांच्या बंगल्यावर धडकले होते. पोलिसांना ते पेंचकडे गेल्याची माहिती मिळाली.

---

परवाना रद्द करणार - अमितेशकुमार

मनाई आदेश धुडकावण्याचा निर्ढावलेपणा करणाऱ्या तुली हॉटेलचा मद्य परवाना रद्द करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवणार आहोत. गुन्हेगारी आणि गैरप्रकार रोखण्याठी मी आवश्यक ते सर्वच प्रयत्न करेन. त्यासाठी कुणी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट मत या कारवाईच्या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतजवळ व्यक्त केले.

Web Title: Police raid a dirty party in Tuli Imperial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.