नागपुरात ‘नायलॉन’ मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 09:49 PM2018-01-13T21:49:07+5:302018-01-13T21:55:29+5:30
राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी शहरातील विविध भागांत छापेमारी करत लाखो रुपयांचा अवैध मांजा जप्त केला. शहरातील विविध बाजारांमध्ये ‘नायलॉन’ मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी शहरातील विविध भागांत छापेमारी करत लाखो रुपयांचा अवैध मांजा जप्त केला. शहरातील विविध बाजारांमध्ये ‘नायलॉन’ मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती हे विशेष.
शहरात मोठ्या प्रमाणावर ‘नायलॉन’ मांजा विकण्यात येत असून खरेदी करणाऱ्यांमध्ये अगदी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट शब्दांत निर्देश दिल्यानंतरदेखील या जीवघेण्या मांजाचा उपयोग सुरू आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी जुनी शुक्रवारी परिसरात छापा टाकला. यावेळी नितीन जैस या विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात ‘नायलॉन’ मांजा आढळून आला. त्याच्याकडून १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा ‘नायलॉन’ मांजा तसेच पतंगी व चक्रीदेखील जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर ‘एव्हायर्नमेन्ट प्रिव्हेन्शन अॅक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारीदेखील पोलिसांनी महाल, सक्करदरा, जुनी शुक्रवारी येथील काही दुकानांची तपासणी केली.
पोलिसांचा राहणार ‘वॉच’
मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील पोलिसांची ‘नायलॉन’ मांजा विकणारे तसेच वापरणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. कुठलीही व्यक्ती हा मांजा विकताना किंवा याचा उपयोग करताना आढळून आली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘नायलॉन’ मांजा वापरल्यास गुन्हा
‘बॉम्बे पोलीस अॅक्ट’मध्ये पतंगांबाबत कलम ११३, ११७ अंतर्गत तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. जर पतंग उडविण्यामुळे कोणाला शारीरिक इजा किंवा नुकसान होणार असेल तर कलम ११३ नुसार तो गुन्हा ठरतो व त्या व्यक्तीला कलम ११७ नुसार १२०० रुपयांचा दंड होऊ शकतो. त्याशिवाय यात स्पष्ट करण्यात आले आहे की जर अशा प्रकारे कुणी पतंग उडविताना दिसला तर पोलिसांनी त्या व्यक्तीला तिथेच थांबविले पाहिजे. जर यामुळे कोणी मरण पावला तर भा.दं.वि.च्या कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होतो. त्यामुळे ‘नायलॉन’ मांजा वापरणाऱ्यांवरदेखील पोलीस गुन्ह्याची नोंद करु शकतात.