रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:43+5:302021-09-15T04:12:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - घराबाहेर पडलेली मुलगी घरी परत येईपर्यंत पालकांच्या जीवाला सारखा घोर असतो. शहरात जागोजागी पोलीस ...

Police ready for road rage | रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज

रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - घराबाहेर पडलेली मुलगी घरी परत येईपर्यंत पालकांच्या जीवाला सारखा घोर असतो. शहरात जागोजागी पोलीस दिसत असले आणि महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत पोलीस अलर्ट असले तरी मुलगी घरी परत येईपर्यंत त्यांच्या हृदयाची धडधड तीव्रच असते.

दिल्लीनंतर मुंबईच्या साकीनाका परिसरात पुन्हा एकदा निर्भया कांड घडले. त्यामुळे मुलींचे आईवडील असलेले जीव पुन्हा एकदा अस्वस्थतेच्या भोवऱ्यात सापडले आहे. शहरातील विविध भागात खास करून गर्दीच्या ठिकाणी सडकछाप मजनू महिला-मुलींना खेटण्याचा, नकोशी नजर टाकून, टोमणे मारून आपली विकृती प्रदर्शित करीत असतात. जवळपास प्रत्येकच पालक हे बघत, अनुभवत असतो. त्यामुळे आपली शिक्षण अथवा इतर दुसऱ्या कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेली मुलगी कुण्या रोडरोमिओच्या विकृतीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बळी तर पडत नसेल ना, तिला कुणी टोमणे तर मारत नसेल ना, या विचाराने पालकांची चिंता वाढलेली असते. ती घरी सुखरूप परतल्यानंतर अन् तिचा हसमुख चेहरा बघितल्यानंतरच पालकांच्या जीवात जीव येतो.

---

या ठिकाणी रोडरोमिओ सक्रिय

इटरनिटी मॉल चाैक, झांशी राणी चाैक आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसर ही नागपुरातील चिडीमारांची मुख्य ठिकाणं आहेत. विशेष म्हणजे, या तीनही ठिकाणी रोडरोमिओंच्या रुपातील ऑटो चालकांची संख्या जास्त आहे. महिला-मुलींना प्रवासी म्हणून बसवून घेण्याच्या बहाण्याने हे भामटे त्यांना मनस्ताप देतात. गेल्या अनेक वर्षांपासून चिडीमारीचे हे प्रकार सुरू होते. मात्र, अलीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात का होईना ऑटो चालकांवर नजर रोखल्यामुळे चिडीमारीच्या घटनांना काहीसा आळा बसला आहे.

---

दोन डझन रोडरोमिओंना दणका

शहर पोलिसांनी गेल्या ९ महिन्यात चिडीमारी करणारे, अश्लील हातवारे करणाऱ्या सुमारे दोन डझन सडकछाप मजनूंना पोलिसांनी वेगवेगळ्या भागात दणका दिला. शहरातील काही ठिकाणे अधोरेखित करून सडकछाप मजनूंवर पोलिसांनी नजर ठेवली आणि नजरेस पडताच या भामट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कोठडीत डांबण्यात आले.

---

नियंत्रण कक्षात संपर्क करा

प्रत्येक शहरात सडकछाप मजनू जागोजागी आढळतात. मोठ्या नगरात त्यांची संख्या जास्त असते. मात्र, कोणत्याही भागात कधीही कोणत्या रोडरोमिओने छेड काढली किंवा तसा प्रयत्न केला तर संबंधित महिला, मुलींनी तत्काळ १०० नंबरवर फोन करून नियंत्रण कक्षात माहिती द्यावी. पोलीस लगेच या सडकछाप मजनूंचा बंदोबस्त करतील.

---

दामिनी पथके कार्यरत

शहर पोलीस दल महिला मुलीच्या सुरक्षेच्या संबंधाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहेत. रोडरोमिओंचा बंदोबस्त तसेच अडचणीत असलेल्या महिला-मुलींच्या मदतीसाठी शहरात दामिनी पथकं कार्यरत आहेत. एका पथकात ५ महिला पोलिसांचा समावेश असलेल्या या प्रत्येक पथकाला स्वतंत्र मोठे वाहन देण्यात आले आहे. शहरातील विविध भागात, खास करून गर्दीच्या भागात ही पथके गस्तीवर असतात.

----

महिला - मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

महिला-मुलींच्या सुरक्षेला शहर पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महिला-मुलींवर अत्याचार अथवा छेडछाडीसारखे प्रकार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला देण्यात आल्या आहेत, असे या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले.

---

Web Title: Police ready for road rage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.